भररस्त्यात गळ्यावर चाकूने वार करून पत्नीची हत्या ; कर्जत तालुक्यातील धक्कादायक घटना
अहमदनगर : पती-पत्नीमध्ये राशीनच्या बाजारपेठेत वाद झाला. तो विकोपाला गेल्याने भररस्त्यात पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून हत्या केली. दोघांचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या मेहुणीवरही हल्ला केल्याने तीही जखमी झाली आहे. त्यानंतर आरोपी पळून गेला. पत्नीने आपला मोबाइल लपवून ठेवल्याच्या आणि मागणी करूनही देत नसल्याच्या कारणातून त्याने पत्नीवर सपासप वार केले. आज (शुक्रवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना कर्जत तालुक्यातील राशीन गावात घडली. कर्जत पोलिसांनी काही तासांत आरोपीस अटक केली.
दीपाली राहुल भोसले (वय २५, रा. राशीन) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लता बारकू ऊर्फ गंगाराम आढाव (रा. राशीन) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राहुल सुरेश भोसले (रा. राशीन) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली बहीण लतासह आज सकाळी नऊच्या सुमारास राशीन येथील कापड दुकानात कामावर जात होती. यावेळी रस्त्यावर अडवून पती राहुल भोसले याने, माझा मोबाईल दे, असे म्हणत तिच्याबरोबर भांडण झाले . या रागामधून त्याने पत्नीवर चाकूने हल्ला केला. यामध्ये एक वार पत्नीच्या गळ्यावर केल्यामुळे ती जागीच ठार झाली. दरम्यान, लता तिला वाचविण्यासाठी गेली असता तिच्यावरही राहुलने वार केला. त्यात तिच्या उजव्या डोळ्याला जखम झाली. हातातील जेवणाच्या डब्याने लताने आरोपीस मारहाण केल्याने तो घटनास्थळावरून पळून गेला.
त्यानंतर लताने नागरिकांच्या मदतीने जखमी दीपालीस खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी कर्जत किंवा नगरला पुढील उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. कर्जत उपजिल्हा रुग्णालयात तिला नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेनंतर आरोपी भोसले राऊत वस्ती येथील काटेरी झुडपात लपून बसला होता. पोलिसांनी माग काढत त्याला दुपारी अटक केली. दरम्यान, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!