अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, पुण्यात तीन महिन्यांच्या बाळाचा गळा दाबून आईनेच खून
पुणे : बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आईनेच आपल्या बाळाचा गळा दाबून खून केला व त्यानंतर १३ वर्षाच्या मुलाच्या मदतीने तिचा मृतदेह गोणीत भरुन बंडगार्डन पुलावरुन नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलीबाबत नातेवाईकांना काय सांगायचे या कारणावरुन तिनेच हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पल्लवी असे आरोपी आईचे नाव असून तिला अटक करण्यात आली आहे. तसेच, तिच्या १३ वर्षाच्या मुलास देखील ताब्यात घेण्यात आले आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आई पल्लवीचे एका मजुरासोबत अनैतिक संबध होते व त्यातून तिला दिवस गेले होते. त्यापूर्वीच ती पती पासून वेगळी राहत असल्याने, याबाबत गावामध्ये सर्वांना काही दिवसांनी माहिती होईल, या भीतीपोटी ती येरवडा येथे राहणार्या भावाकडे १३ वर्षांच्या मुलासह राहण्यास आली होती.
दरम्यान तिला तीन महिन्यांपूर्वी मुलगी झाली होती. त्यानंतर घरामध्ये सर्व ठिकठाक सुरू असताना. दिवाळीनंतर गावी जावे लागणार असल्याने, गावामध्ये बाळाबद्दल सर्वांना माहिती होणार, आता काय करायचे? असा विचार आरोपी आईच्या डोक्यात सतत येत होता. यातूनच तिनेन शुक्रवारी आपल्या तीन महिन्यांच्या मुलीचा गळा दाबून तिला एका पिशवी मध्ये ठेवले आणि तिच्या १३ वर्षांच्या मुलास घरापासून काही अंतरावर असलेल्या नदी पात्रात टाकण्यास सांगितले. त्या अल्पवयीन मुलाने देखील आईने सांगितल्याप्रमाणे केले.
त्यानंतर काही वेळाने आरोपी आई मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यास पोलिसांकडे केली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन चौकशीस सुरुवात केली. सायंकाळच्या वेळी ती झोपल्याचे सांगत होती. ती व तिच्या मुलाच्या बोलण्यात विसंगती दिसून आल्याने पोलिसांचा त्यांच्यावरील संशय वाढला.
चौकशीदरम्यान काही संशयास्पद बाबी आढळून आल्या. त्यानंतर अधिक चौकशीत या महिलेने ही मुलगी सतत रडत होती. रात्र रात्र जागवायची. अनैतिक संबंधातून तिचा जन्म झाला होता. मुलीबाबत नातेवाईकांत काय सांगायचे, यामुळे आपणच तिचे तोंड दाबून तिला जीवे ठार मारले व तिच्याच १३ वर्षाच्या मुलाच्या मदतीने तिचा मृतदेह गोणीत बांधून बंडगार्डन पुलावरुन नदीत फेकून दिला असल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, तिथे पिशवीच्यावर दगड होते आणि त्याखाली तीन महिन्याची मुलगी मृत अवस्थेत होती. त्यानंतर तो शवविच्छेदनाकरीता ससून रुग्णालयात पाठवून दिला. या अपहरणाच्या गुन्ह्यात मुलीची आईला अटक केली असून तिच्या १३ वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले घेण्यात आले आहे. तीन महिन्याच्या मुलीचे अपहरण झाल्याचे व तिच्याच भावाने खून केल्याची माहिती अगोदर सर्वत्र पसरल्याने एकच खळबळ उडाली होती. प्रत्यक्षात पोलिसांनी दोघांकडे वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या तपासात आईनेच हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख, पोलीस निरीक्षक विजयसिहं चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्रकुमार वारंगुळे, किरण लिट्टे, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर, पोलीस अंमलदार तेजस भोसले, सिद्धाराम पाटील, अमजद शेख, शुभांगी चव्हाण, विष्णु ठाकरे, अनिल शिंदे यांनी हा तपास केला.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!