बनावट चावीच्या सहाय्याने दुचाकी चोरी करणा-या तिघांना अटक, 14 दुचाकी जप्त

पिंपरी चिंचवड :बनावट चावीच्या साहाय्याने दुचाकी सुरु करून ती चोरून ट्रॅव्हल्सच्या डिक्कीमधून यवतमाळ, बुलढाणा यांसारख्या शहरात विक्रीसाठी पाठवणा-या तिघांना तसेच चोरीच्या दुचाकी विकत घेणा-या चौघांना महाळुगे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

अमित गोपाल तायडे (वय 27, रा. महाळुगे, ता. खेड),श्रीकांत हरिदास चक्रनारायण (वय 31, रा. महाळुगे, ता. खेड), गोपाळ सुभाष कांडेलकर (वय 27, रा. मेदनकरवाडी, चाकण, ता.खेड) अशी वाहन चोरी करणा-या आरोपींची नावे आहेत. यांच्यासह
चोरीची दुचाकी खरेदी करणारे राजेश्वर हिरासिंग चव्हाण (वय 42), गजानन रामचंद्र चव्हाण (वय 35), दुर्योधन श्रीराम चव्हाण (वय 42, तिघे रा. कोहळा, पो. धामणगावदेव, ता.दारवा, जि.
यवतमाळ), मोहन ओमकार सपकाळ (वय 32, रा. तालखेड, ता. मोताळा, जि. बुलढाणा) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

महाळुगे पोलीस चौकी हद्दीमध्ये वाहन चोरीचे प्रमाण वाढल्याने महाळुगे पोलिसांनी वारंवार गुन्हे घडणार्या ठिकाणचे गुन्हे प्रवण क्षेत्र म्हणुन क्राईम मॅपिंग केले होते. त्यानुसार वारंवार वाहन चोरी होणा-या ठिकाणाला पोलिस ट्रॅप लावुन वाहन चोरी उघड आणणेबाबत प्रयत्न करत होते.

त्यानुसार तपास पथकातील अंमलदारांनी वारंवार वाहन चोरी होणा- या ठिकाणांना भेटी देवुन वाहन चोरी गुन्हे घडले तारीख, वेळ, ठिकाण यानुसार सीसीटिव्ही फुटेजची तपासणी सुरुवात केली. त्याअनुशंगाने महाळुगे पोलिसांनी 245 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच खब-यांकडून माहिती काढली. त्यात वॅरॉक कंपनीजवळ एक संशयित व्यक्ती वाहनांची पाहणी करताना पोलिसांना आढळला. त्याचा माग काढून त्याला आणि त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे चौकशी करत त्यांनी ज्यांना चोरीच्या दुचाकी विकल्या आहेत, अशा चार जणांना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

वाहन चोरटे महाळुगे पोलीस चौकी आणि मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहने चोरून ती ट्रॅव्हल्सच्या डिक्कीतून बुलढाणा, यवतमाळ येथे विक्रीसाठी पाठवत होते. पोलिसांनी तीन लाख 21 हजारांच्या 14 दुचाकी जप्त केल्या आहेत.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे यांच्या सुचना व मार्गदर्शना
खाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळींग, सारंग चव्हाण, उपनिरीक्षक दिनेश चव्हाण, पोलीस अंमलदार चंद्रकांत गवारी, राजू कोणकेरी, राजू जाधव, अमोल बोराटे, अशोक जायभाये, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, प्रीतम ढमढेरे, श्रीधन इचके, युवराज बिराजदार, किशोर सांगळे, शिवाजी लोखंडे,शरद खैरे यांनी केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.