आर्यन खानला जामीन मंजूर, उद्या किंवा परवा जेलमधून सुटका

मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे. यामुळे त्याचे वडील आणि बॉलिवुड सुपरस्टार शाहरुख खानला दिलासा मिळाला आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांनाही कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने दोन ते तीन दिवस या प्रकरणाची सुनावणी घेतली. त्यानंतर नुकतेच तिघांचा जामीन मंजूर केला आहे. याबाबतचा सविस्तर आदेश कोर्ट उद्या पोलिसांना देईल. त्यानंतर तिन्ही याचिकाकर्ते उद्या संध्याकाळी किंवा शनिवारी तुरुंगाबाहेर येतील, असं आर्यन खानचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी माध्यमांना सांगितलं.

गेल्या 25 दिवसांपासून तुरुंगात असलेल्या आर्यन खानच्या जामीनासाठी शाहरुख खानने खूप प्रयत्न केले असून त्यासाठी आतापर्यंत तीन वकील बदलले आहेत. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्याने ड्रग्ज घेतलेले कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एनसीबीने अधिकरांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडले, त्याची वैद्यकीय चाचणीदेखील केली नाही असा आरोप आर्यन खानच्या वकिलांनी केला होता. आर्यन हा शाहरूख खानचा मुलगा असल्याने हे प्रकरण तपास यंत्रणेने ताणून धरले असून तो सर्वसामान्य मुलगा असता तर हे प्रकरण एवढं वाढलच नसतं असही वकिलांनी कोर्टाला सांगितलं. आर्यन खानला या प्रकरणात पूर्णपणे गोवण्यात आल्याचा दावा त्याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केला होता.

आर्यन खान क्रूझ पार्टी ड्रग्ज प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम

2 ऑक्टोबरच्या शनिवारी मुंबई क्रुझ टर्मिनलवर धाड

3 ऑक्टोबरला रविवारी आर्यनला अटक आणि सुट्टिकालीन कोर्टाकडनं पहिली रिमांड 4 ऑक्टोबरपर्यंत

4 ऑक्टोबरला पुढील तपासासाठी एनसीबीला नियमित कोर्टाकडनं मिळाली 7 ऑक्टोबरपर्यंत रिमांड

7 ऑक्टोबरला मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टानं आर्यनला न्यायालयीन कोठडी सुनावली

आर्यन खानची रवानगी आर्थर रोड कारागृहात, कोरोनाकाळामुळे नियमाप्रमाणे आठवड्याभरासाठी विलगीकरण कक्षात ठेवलं

न्यायालयीन कोठडी मिळताच आर्यनच्या जामिनाची याचिका सादर करण्यात आली

8 ऑक्टोबरला जामीनावर सुनावणी झाली, मात्र एनसीबीनं त्यावर आक्षेप घेतला

मुख्य महानगदंडाधिकारी कोर्टाच्या कार्यक्षेबाहेरील हे प्रकरण असल्याचा एनसीबीचा दावा मान्य, जामीन फेटाळला

9-10 ऑक्टोबर शनिवार रविवार असल्यानं कोर्ट बंद

11 ऑक्टोबरला सोमवारी जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टात सादर

एनसीबीनं अपेक्षेप्रमाणे उत्तर देण्यासाठी मागितला आठवड्याचा अवधी, मात्र बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे कोर्टाकडून निर्देश

12 ऑक्टोबर कोर्टात काहीही कारवाई नाही

13 ऑक्टोबर जामीनावर सुनावणी, एनसीबीचा जोरदार विरोध

समाजातील प्रतिष्ठा पाहता तो बाहेर आल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो. तसेच आपलं वजन वापरून त्याच्यावतीनं पुराव्यांशी छेडछाड आणि अन्य साक्षीदारांवर दबावही आणला जाऊ शकतो. असा दावा करत एनसीबीनं बुधवारी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला.

आरोपीकडे अमली पदार्थ सापडोत अथवा न सापडोत, एनडीपीएस कायद्यातील कलम 29 नुसार अश्या कटात सामील असणं हा एक गंभीर गुन्हा आहे. तुमच्याकडे ड्रग्ज नाही जरी सापडले तरी जेव्हा एनडीपीएस कायद्यातील कलम 29 लावलं जातं तेव्हा आरोपी मुख्य सुत्रधाराइतकाच दोषी असतो असं एनसीबीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी कोर्टाला सांगितलं.

14 ऑक्टोबरला जामीनावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश वी.वी. पाटील यांनी निकाल राखून ठेवला

15 ते 19 ऑक्टोबर कोर्ट सणासुदीच्यानित्तानं बंद असल्यामुळे निकाल 20 ऑक्टोबरपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न करू : कोर्ट

20 ऑक्टोबर कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.