आर्यन खान अखेर जामिनावर तुरुंगाबाहेर, मन्नत’कडे रवाना

मुंबई : क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या बॉलिवूडचा  किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची सुटका झाली आहे. आर्यन खान तब्बल 26 दिवसानंतर आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आला आहे. आर्यन आलिशान रेंज रोव्हर कारमध्ये बसून ‘मन्नत’च्या दिशेने रवाना झाला आहे. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यनला गुरुवारी संध्याकाळी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. अन्य कायदेशीर प्रक्रिया काल वेळेत पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आर्यनची काल सुटका होऊ शकली नाही.

आज सकाळी आर्थर रोड कारागृह प्रशासनातील अधिकाऱ्यांना आर्यनच्या सुटकेच्या आदेशाची प्रत मिळाली. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण करुन आर्यन सकाळी ११ च्या सुमारास आर्थर रोड कारागृहाबाहेर आला. शाहरुख सकाळपासून वरळीच्या फोर सिझन हॉटेलमध्ये आहे. आर्यन तुरुंगातून सुटल्यानंतर थेट फोर सिझन हॉटेलमध्ये गेला. तिथे वडिल आणि मुलाची भेट झाली. तिथून आता दोघे मन्नतवर जातील.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकला त्या दिवसापासून त्याचे वडील शाहरुख खान सोशल मीडियापासून दूर होता. गुरूवारी आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुखने सुटकेचा निश्वास सोडला. ऐवढ्या दिवस चिंतेत असलेल्या शाहरुखच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच हसू पाहायला मिळाले. शाहरुख खानचा वकिलांच्या टीमसोबत काही फोटो व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये शाहरुख खूपच खूश असल्याचे पाहायला मिळाले.

शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर चाहत्यांनी केली गर्दी

आर्यन खानला मुंबई हायकोर्टातून जामीन मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी हा क्षण साजरा करण्यासाठी त्याच्या बंगल्याबाहेर गर्दी केली होती. जामीन आदेशानंतर, चाहत्यांनी शाहरुख खानच्या निवासस्थान मन्नत बाहेर जमण्यास सुरुवात केली जिथे गर्दी नियंत्रित करण्यासाठी 20 पोलिस तैनात करण्यात आले होते. आर्यनला अटक झाल्यानंतर 20 दिवसांनंतर जामीन मिळाला. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अंमली पदार्थ जप्त केल्याप्रकरणी एनसीबीने आर्यनला अटक केली होती.

जामीनाला एनसीबीचा तीव्र विरोध

एनसीबीची केस अशी आहे की, आर्यनने एकप्रकारे जाणीवपूर्वक अमलीपदार्थ बाळगले होते. त्याचे अमलीपदार्थ विक्रेत्यांशी संबंध आहेत आणि अटकही वैध आहे. तो कटाचा एक भाग आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळावा अशी मागणी एनसीबीचे वकील अनिल सिंग यांनी केलीय. एनसीबीचा तपास अजून सुरु आहे. आरोपींना जामिनावर सोडलं तर ते साक्षी पुराव्यांविषयी छेडछाड करु शकतात, असा युक्तिवाद एनसीबीचे वकील अनिल सिंग यांच्याकडून करण्यात आला होता.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.