बांधकाम इमारतीचा स्लॅब कोसळला, सात कामगार जखमी
बालेवाडी : बालेवाडीतील पाटील नगर येथे शनिवारी रात्री बांधकाम प्रकल्पाच्या पार्किंग पोडियमचा स्लॅब कोसळला. या घटनेत सात कामगार जखमी झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढून तत्काळ रुग्णालयात दाखल केले. ही घटना शनिवारी (दि. 30) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास वाकड येथे अॅवॉन विस्टा कन्स्ट्रक्शन साईटवर घडली. याप्रकरणी दोन अभियंत्यांसह साईट सुपरवायझर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साईराज बिल्डकॉनचे सीनियर इंजिनियर देवेंद्र गायकवाड, साईराज बिल्डकॉनचे ज्युनियर इंजिनिअर अजय ढगे, साईट सुपरवायझर तरुण मालदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अशोक निमगिरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नंदू हरी निशाद (वय 29), कार्तिक रूपराय निशाद (वय 18), राजेशकुमार गणीराम यादव (वय 21), दुर्गेश लक्ष्मीनारायण निशाद (वय 30), रविशंकर बिधीलाल साहू (वय 30), लक्ष्मणकुमार (वय 22), रामरतन निशाद (वय 27, सर्व रा. लेबर कॅम्प, अॅवॉन विस्टा कंस्ट्रक्शन साइट, वाकड. मूळ रा छत्तीसगढ) अशी जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडीतील पाटील नगर येथे ऍवॉन विस्टा या बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. प्रकल्पातील दोन इमारतींना जोडणाऱ्या पार्किंग पोडियमचा स्लॅब टाकण्याचे काम शनिवारी रात्री सुरू होते. स्लॅब टाकण्यासाठी उभारलेले सपोर्टींग स्टेज हे स्लॅबच्या आकारमानानुसार, वजन पेलण्याइतपत मजबूत नव्हते. असे असतानाही मजुरांना तेथे स्लॅब टाकण्यास सांगण्यात आले. त्यामुळे स्लॅब कोसळून अपघात झाला. यामध्ये सात कामगार जखमी झाले आहेत. आरोपींनी कामगारांच्या सुरक्षेबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत. त्याबाबत आरोपींनी हयगय आणि निष्काळजीपणा केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!