माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर ईडी कार्यालयात हजर

मुंबई : १०० कोटींच्या वसुली प्रकरणी आरोप असलेले आणि गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर आज प्रकट झाले आहेत. हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत दिलासा न मिळाल्याने आज अखेर अनिल देशमुख हे आज ईडीसमोर हजर झाले आहेत.

१०० कोटींच्या वसुलीप्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीने वारंवार समन्स बजावलं होतं. मात्र, अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. त्यांची ५ कोटींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली होती.  अनिल देशमुख यांना ४ ते ५ वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती.दरम्यान, ईडीकडून चौकशी झाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी ईडीने गेल्या पाच महिन्यांत चौकशीला हजर राहण्यासाठी पाच वेळा समन्स जरी केले होते; पण ते चौकशीसाठी एकदाही हजर झालेले नव्हते. त्याचप्रमाणे सीबीआयने त्यांच्या कार्यालय व  घरावर पाचवेळा छापे टाकले. देशमुख यांनी आपल्यावरील कारवाई रद्द करण्यासाठी न्यायालयात  धाव घेतली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. कारवाईपासून संरक्षण हवे असल्यास ते विशेष न्यायालयात जाऊ शकतात, असे हायकोर्टाने सांगितले होते. दरम्यान, अनेक दिवस गायब असलेले अनिल देशमुख आज सकाळी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात हजर झाले. त्यावेळी अनिल देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हे देखील त्यांच्यासोबत होते. आता ईडीकडून अनिल देशमुख यांच्या चौकशीला सुरुवात झाली असून, ही चौकशी अनेक तास चालण्याची शक्यता आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप झाले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात चौकशीस सुरुवात झाली होती. अनिल देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट देत होते. १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगायचे. मुंबईतील बार रेस्टॉरंटमधून वसुली करण्यास सांगायचे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून पोलिसांना बंगल्यावर बोलवायचे, असा आरोप अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आला होता.

अनिल देशमुखांच्या खास माणसाला CBI ने केली ठाण्यात अटक

रविवारी 100 कोटी वसुली प्रकरणी ठाण्यात (thane) कारवाई करण्यात आली आहे. ठाण्यातून सीबीआयने (cbi) एका व्यक्तीला अटक केली आहे. ही व्यक्ती अनिल देशमुख यांच्या जवळचा माणूस असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 100 कोटी वसुली प्रकरणाची लिंक आता ठाण्यात पोहोचली आहे. ठाण्यातून सीबीआयने संतोष शंकर जगताप (Shankar Jagtap ) नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.

 

ठाण्यातील वसंत विहार इमारतीतून जगतापला अटक करण्यात आली आहे. 22 व्या मजल्यावर जगताप राहत होता. दरवाजा उघडत नसल्याने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडून अटक केली. ही संपूर्ण कारवाई शनिवारी मध्यरात्री झाली. त्याच्याकडून 9 लाख रुपये जप्त करण्यात आले अशी माहिती समोर आली आहे. शंकर जगताप हा अनिल देशमुख यांच्या खास व्यक्ती असल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयने जगतापला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची सीबीआय कोठडीत रवानगी केली आहे. 4 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया..

कायद्यापेक्षा कोणीच मोठा नाही. त्यामुळे लपण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी दिली. देशमुख यांनी न्यायालयात याचिका दाखल करून दिलासा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोर्टाने त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा न मिळाल्याने त्यांनी ईडी कार्यालयात हजर राहण्याचा निर्णय घेतला असेल, असंही प्रवीण दरेकर टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हणाले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.