मोठी बातमी ! राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक; १३ तासांच्या चौकशीनंतर EDची कारवाई!

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे. देशमुख यांची सोमवारी १३ तास ईडीकडून चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर अखेर रात्री उशिरा देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. देशमुख यांना मंगळवारी सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यावरून केंद्रीय तपास यंत्रणांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे. या कारवाईने महाविकास आघाडी सरकारच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत. आजपर्यंत ‘ईडी’ने चार वेळा देशमुख यांना समन्स पाठवले होते. मात्र त्यांनी वकिलांच्या मार्फत उत्तर देत कारवाईचा तपशिल मागितला होता.

‘ईडी’च्या संभाव्य कारवाईच्या विरोधात न्यायालयीन लढाईत अपयश आल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले अनिल देशमुख हे सोमवारी प्रथमच समोर आले आणि सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात पोहोचले होते. यावेळी देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकीलही उपस्थित होते. दिवसभर अनिल देशमुख यांची चौकशी झाली आणि सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दिल्लीतील काही अधिकारी ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर पुन्हा देशमुख यांची चौकशी झाली आणि अखेर रात्री उशिरा त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेले जाईल. यानंतर सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

देशमुख चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते

विशेष म्हणजे अनिल देशमुख चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळालीय. अनिल देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हेदेखील ईडी कार्यालयात गेले होते. अनिल देशमुख यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू असताना दिल्लीतून काही अधिकारी सायंकाळी 7.30 सुमारास मुंबईत दाखल झाले आणि ते थेट ईडीच्या कार्यालयात गेले. त्यानंतर त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात या आधी 5 वेळा त्यांना समन्स बजावण्यात आला होता. पण तरीसुद्धा ते ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. प्रकृती आणि वयाची कारणे देत अनिल देशमुख यांनी ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यास टाळाटाळ केल्याचं सांगितलं जात होतं.

देशमुखांचे दोन्ही पीए पालांडे आणि कुंदन यांच्याविरोधात ईडीकडे महत्त्वाचे पुरावे

विशेष म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही अटक झाली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांचे दोन्ही पीए पालांडे आणि कुंदन यांच्याविरोधात ईडीच्या महत्त्वपूर्ण पुरावे लागले होते. त्याच पुराव्यांच्या आधारेच त्यांना बेड्या ठोकल्या होत्या.

यापूर्वी सीबीआयकडूनही 10 ठिकाणी छापे

दरम्यान, सीबीआयने 21 एप्रिल रोजी अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले होते. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले होते. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली.  तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले होते.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून १०० कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण, कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.