७० वर्षीय वृध्द महिलेच्या हत्येचे गूढ उलगडले; अल्पवयीन मुलांनी CID पाहून रचला कट

पुणे : सीआयडी मालिका पाहून पुण्यात दोन अल्पवयीन आरोपींनी ७० वर्षीय महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील हिंगणे खुर्द येथील 70 वर्षीय महिलेच्या खूनाप्रकरणी सिंहगड पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे.शालीनी बबन सोनवणे (वय-70) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,30 तारखेला सायली हाईटस फ्लॅट नं. 7 हिंगणे खुर्द येथील एका घरामध्ये चोरी झाली असुन घरामध्ये वयस्कर महिला जखमी आणि बेशुध्द अवस्थेत पडली आहे. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता 70 वर्षीय शालीनी बबन सोनवणे यांना पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. परंतू रुग्णालयात पोहचल्यावर उपचाराआधीच डॉक्टरांनी सोनावणे यांना मृत घोषित केलं.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यावेळी घरातील कपाट उघडे असल्याने चोरीच्या उद्देशाने महिलेचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. सिहंगड रोड पोलीस ठाण्यातील तपास पथकाने आरोपींचा शोध सुरु केला. परंतु घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरा तसेच प्रत्यक्षदर्शी नसल्याने पोलिसांसमोर या गुन्ह्याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान होते.

दरम्यान मंगळवारी (दि.2) तपास पथकाचे पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी यांनी घटनास्थळाजवळ असलेल्या रोकडोबाबा मंदिराजवळ खेळणाऱ्या मुलांकडे चौकशी केली. त्यावेळी मुलांनी सांगितले की, 30 ऑक्टोबर रोजी पाणीपुरी खायला जात असताना, त्यांचे दोन मित्र पाणीपुरी न खाताच गडबडीने घरी गेले.
त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता दोन मुले गडबडीने जात असल्याचे दिसून आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी 16 आणि 14 वर्षांच्या दोन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करत असताना त्यांनी न गडबडता आणि चेहऱ्यावरती कोणताही हावभाव न दाखवता पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.याचवेळी एकाला घरात चोरी करण्याची सवय असल्याची माहिती मिळाली.

अल्पवयीन मुलांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली देत धक्कादायक माहिती दिली. आरोपींचे मयत शालीनी बबन सोनवणे यांच्या घरात नेहमी येणेजाणे होते व मयत महिलेकडे कायम खुप पैसे असतात व ते पैसे कोठे ठेवतात याबाबत माहिती होती. सुमारे दोन महिन्यापुर्विच त्यांनी सीआयडी मालिका पाहून चोरी करण्याचा कट रचुन घराची चावी चोरली होती. परंतु मयत या वयस्कर असल्याने त्या घर सोडुन कोठेही जात नव्हत्या. त्यामुळे त्यांना चोरी करता येत नव्हती. त्यानंतर त्यांनी घरात शालीनी या एकटया असताना घरात जावुन चोरी करण्याची योजना आखली तसेच मयत महिलेने विरोध केला तर त्यांना मारण्याची ही तयारी केली होती, अशी माहिती आरोपींनी दिली.

30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वा सुमारास महिला या घरामध्ये एकटया असल्याची खात्री त्या दोघांनी केली. त्यानंतर घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळी महिला या टीव्ही पाहत होती..त्यांच्यासोबत आरोपी देखील टीव्ही पाहू लागले. महिलेचे लक्ष नसताना त्यांना पाठीमागून ढकलुन देवुन त्याचे तोंड व नाक दाबुन खुन केला.
त्यानंतर कपाटातील 93 हजार रुपये रोख रक्कम व 67 हजार 500 रुपये रकमेचे सोन्याचे दागिने असा एकुण 1 लाख 60 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करुन नेला होता. हा गुन्हा करताना सीआयडी मालिका पाहुन आपल्या हाताचे ठसे कोठे उमटु नये याकरीता हॅण्डग्लोजचा वापर केला होता. आरोपींनी चोरलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.