माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई: माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना 19 नोव्हेंबरपर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे. देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांची रवानगी ऑर्थर रोड किंवा इतर तुरुंगात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अनिल देशमुख यांची ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना आत पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी ईडीच्या वतीने अॅड. अनिल सिंग यांनी जोरदार युक्तिवाद केला. अनिल देशमुख यांच्या वकिलांनीही जामीन का मिळावा याबाबतचा युक्तिवाद केला. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून देशमुख यांना 19 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता देशमुख हे ईडीच्या कोठडीत न राहता त्यांची रवानगी तुरुंगात होणार आहे.
अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले. देशमुख यांना शनिवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान, ईडीने त्यांच्या कोठडीची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने नकार देत देशमुख यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीने सोमवारी अनिल देशमुखला अटक केली होती. चौकशीदरम्यान, अनिल देशमुख यांच्याकडून कोणत्याही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यात आली नसल्याचे तपास यंत्रणेला आढळून आले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, यापूर्वी ईडीने अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख याला चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते.
ऋषिकेश देशमुखांना ईडीचं समन्स
अनिल देशमुखनंतर मुंबईतील ईडी कार्यालयात ऋषिकेश देशमुख यांना गुरुवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. ईडीचे अधिकारी ऋषिकेश देशमुख यांची कसून चौकशी करतील, अशी शक्यता होती. दरम्यान ऋषिकेश देशमुख गुरुवारी ईडीसमोर हजर झाले नाहीत. तर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे.
काय आहे प्रकरण?
25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या बाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन सापडले होते. या प्रकरणात मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाजे यांचे नाव समोर आले होते. यानंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची महाराष्ट्र सरकारने बदली करून त्यांना होमगार्डचे डीजी बनवले होते. यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना सचिन वाजे यांच्याकडे दरमहा 100 कोटींची मागणी केल्याचा दावा माजी आयुक्तांनी या पत्रात केला होता.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!