महिलेने सोन्याच्या दुकानातून सोन्याचे ब्रेसलेट केले लंपास,आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
भोसरी; ग्राहक बनून आलेल्या महिलेने दुकानातील कामगाराचे लक्ष विचलित करून हातचलाखीने दुकानातून २६ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे ब्रेसलेट चोरून नेले. हा प्रकार शुक्रवारी (दि.१२) सायंकाळी आळंदी रोड भोसरी येथे एसजेपीएल सोनिगरा या दुकानात उघडकीस आला.
वीरेंद्र सोहनराज मेहता (वय ४२, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या सोन्याच्या दुकानात दररोज रात्री दागिन्यांचा स्टॉक तपासतात. दिवसभरात किती दागिने विकले गेले, किती शिल्लक आहेत याबाबतची माहिती ते दररोज रात्री घेत असतात. १२ नोव्हेंबर रोजी काम झाल्यानंतर रात्रीच्या वेळी नेहमीप्रमाणे त्यांनी दुकानातील दागिन्यांचा स्टॉक चेक केला. त्यावेळी एक सोन्याचे ब्रेसलेट काउंटरवर काम करणा-या भारत कुळसुंदर यांच्याकडील स्टॉकमध्ये कमी आढळले.
त्यामुळे फिर्यादी यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वापाच ते पावणे सहा वाजताच्या कालावधीत त्यांच्या दुकानात एक महिला आली होती. तिने ते २६ हजार ५०० रुपयांचे ५.३१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट चोरतानाचे आढळून आले. त्या महिलेबाबत आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली मात्र त्या महिलेबाबत काहीही माहिती न मिळाल्याने याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!