मोबाईलवर खेळलेल्या सट्ट्यातील चार लाखांच्या वसुलीसाठी तरुणाचे अपहरण, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून १ लाख लुबाडले ; कोंढव्यातील घटना

पुणे : मोबाईलवर खेळलेल्या सट्ट्यातील तब्बल ४ लाख रुपयांची वसुली करण्यासाठी ५ जणांनी तरुणाचे अपहरण करुन त्याच्या खिशातील सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल व गुगल पे वरुन १५ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करुन १ लाख रुपयांचा घेऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी ५ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १० सप्टेबर, १८ व १९ ऑक्टोबर रोजी बिबवेवाडी व कोंढव्यात घडला.

अभय जोगदंड (वय ३०, रा. अपर डेपो, बिबवेवाडी), अभी बाळशंकर (वय ३२, रा. काकडेवस्ती, कोंढवा) आणि त्यांच्या ३ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी राजेंद्र संगय्या हिरेमठ (वय ३५, रा. बिबवेवाडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मोबाईलवर खेळलेल्या सट्ट्यामध्ये ३ लाख ९६ हजार रुपये हरले होते. हे पैसे परत देत नाही, म्हणून आरोपींनी प्रथम १० सप्टेबर रोजी फिर्याद यांना आमचे पैसे आताच्या आता दे नाही तर तुला उचलून नेतो व तुझे हात पाय तोडतो, अशी धमकी दिली होती. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी अक्कलकोट येथे फिर्यादी यांच्या पत्नीकडून फिर्यादीचा मोबाईल व पर्वतीतील जनता वसाहत येथे लावलेल्या भिशीच्या संबंधाने करायच्या केसची कागदपत्रे घेतली.

फिर्यादी यांना कारमध्ये घालून त्यांचे अपहरण केले. गाडीत पाईप़ कमरेचा पट्टा, वायर व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या खिशामधील अर्धा अर्धा तोळे वजनाच्या ८ सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल फोन व गुगल पे वरुन १५ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करायला लावले असा १ लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेऊन गेले. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.