कोंढव्यात हुक्का साहित्याच्या गोदामावर पोलिसांचा छापा; 22 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे: हुक्का पार्लरचे साहित्य विकण्यास बंदी असताना, पुण्यातील कोंढवा परिसरातून हुक्क्याच्या साहित्याचा तब्बल २२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील येवलेवाडीत ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४ अ, २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहजाद अश्रफ रंगूनवाला (वय ३७), नावेद मुन्नेखान (वय २१), शफीक महंमद मालापुरी (वय १८, सर्व रा. लेक डिस्ट्रिक्ट सोसायटी, येवलेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने हुक्का पार्लर तसेच हुक्का साहित्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. त्यानंतरही येवलेवाडी येथे एका सोसायटीत तळमजल्यावरील गोदामात हुक्क्याचे साहित्य आणि सुगंधी तंबाखूचा साठा केल्याची माहिती पोलिस नाईक तुषार आल्हाट यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. या कारवाईत हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य, सुगंधी तंबाखू असा २२ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील, गुन्हे शाखेतील निरीक्षक जगन्नाथ जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, हवालदार रमेश गरूड, ज्योतीबा पवार, तुषार आल्हाट, नीलेश देसाई, गोरखनाथ चिनके, सतीश चव्हाण आणि लक्ष्मण होळकर आदींनी कारवाई केली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!