दारू पाजण्याच्या कारणावरून दोन मित्रांमध्ये वाद ; मित्राच्या डोक्यात दगड घालून केला खून

नागपूर : दारू पाजण्याच्या कारणावरून दोन मित्रांमध्ये वाद झाला. त्यामध्ये एकाने दुसऱ्याच्या कानशिलात लावली आणि शिवीगाळ केली. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकाने मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केला. हत्येनंतर मारेकरी युवकाने रक्ताने माखलेल्या कपड्यासह नंदनवन पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले. ही थरारक घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास नंदनवनमधील सेंट झेव्हियर शाळेजवळील मैदानाजवळ घडली.

दिनेश विनायक राजापुरे (३५, रा. दर्शन कॉलनी, तराळे चक्की, नंदनवन) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अतुल हेमराज शिवनकर (२३, रा. श्रीनगर, बालाजी अपार्टमेंट) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश राजापुरे आणि अतुल शिवनकर हे दोघेही मित्र होते. दोघेही सोबतच पेंटिंगच्या कामाचे ठेके घेत होते. दिनेशला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वीच त्याची पत्नी दोन मुलांसह सोडून माहेरी निघून गेली. पत्नी सोडून गेल्यानंतर दिनेश आई-वडिलांसह दर्शन कॉलनीत किरायाने राहायला लागला.

बुधवारी पेंटिंगच्या कामाचे १००० रुपये या दोघांना मिळाले. त्यांनी लगेच काही दारू आणि चकणा विकत घेतला. थेट सेंट झेविअर शाळेमागील मोकळ्या मैदानावर गेले. एका झाडाखाली बसले आणि दोघांनी दारू ढोसली. दिनेशने आणखी एक दारूची बाटली आणण्यासाठी अतुलला जाण्यास सांगितले. तर अतुलने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या दिनेश त्याला शिवीगाळ केली आणि एक कानशिलात लगावली. चिडलेल्या अतुलने त्याला जबर मारहाण केली आणि शेवटी त्याच्या डोक्यात मोठा दगड घालून खून केला.

त्यानंतर अतुल रक्ताने माखलेले हात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये धडकला. मित्राची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांचे पथक अतुलला घेऊन घटनास्थळी गेले. पंचनामा करून दिनेशचा मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अतुलला अटक केली.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.