पुण्यात Facebook Live करत वेटरची आत्महत्या
पुणे : मला फसवून माझ्याकडून वाईट कामे करून घेत असल्याचे फेसबुक लाईव्ह येऊन सांगत एका प्रसिद्ध हॉटेलमधील वेटरने इमारतीच्या 13व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी (दि.१७) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे
अरविंद सिंह राठौर (वय २६, रा. सनेती, उत्तराखंड) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी, मुंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अरविंद हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे. मुंढवा परिसरातील हॉटेल पेंट हाऊस मध्ये तो एक महिन्यापूर्वीच कामाला आला होता. या ठिकाणी वेटरचे काम तो करत होता. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास तो हॉटेलच्या टेरेसवर (तेराव्या मजल्यावर) गेला. त्या ठिकाणी जाऊन त्याने फेसबुक लाइव्ह करत तो आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्याने हॉटेलमधील काही लोकांवर आरोप करत त्यांनी आपले वाईट केले असून, फसवून काही कामे करून घेतल्याचे म्हटले आहे. त्यानंतर तो इमारतीच्या भिंतीवर उभा राहिला. हा प्रकार पाहिल्यानंतर तेथील नागरिकांनी त्याला समजावून थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने काही क्षणातच खाली उडी घेतली.
घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, पोलिस उपनिरीक्षक भोसले व त्यांच्या साथीदारांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अरविंद रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला होता. उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अरविंद याने आत्महत्या का केली, त्या मागचं नेमकं कारण काय आहे? तसेच त्याने आरोप केल्याप्रमाणे कुणी फसवणूक केली आहे? याचा पोलीस तपास करत आहेत. यासोबतच तो मानसिक तणावात होता का? किंवा कौटुंबिक वाद होता का? याबाबतही पोलीस अधिक माहिती घेत तपास करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!