वडिलांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून बहिण – भावाने केला महिलेचा खून
बारामती: शहरातील कसबा या मध्यवर्ती ठिकाणी बहिण भावाने एका महिलेला वडीलांशी मैत्रीचे संबंध असल्याच्या रागातून काठीने बेदम मारहाण करत तिचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. दवाखान्यातून मृत महिलेला परस्पर नेत तिचे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची कुजबुज गेली आठवडाभर बारामतीत सुरु होती. अखेर पोलिसांनी चौकशीअंती तब्बल १२ दिवसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी बहिण-भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषिकेश प्रमोद फरतडे व अनुजा प्रमोद फरतडे (रा. कसबा, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. डाॅ. सुनील रामदास पवार (रा. पवारवस्ती, शारदानगर, माळेगाव खुर्द) यांनी याबाबत फिर्य़ाद दिली.
मिळालेल्या माहितीनुसार,डॉ. पवार यांचे बारामतीत हॉस्पिटल आहे. संशयितांचे वडील प्रमोद उर्फ दादा नामदेव फरतडे हे गेल्या तीन वर्षांपासून डॉ. पवार यांच्याकडे दारुचे व्यसन सोडविण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांचे या कुटुंबाशी कौटुंबिक संबंध आहेत. १० नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजता फिर्यादी डॉ. पवार घरी होते. यावेळी संशयित अनुजा हिने फोन करत वडीलांना एका महिलेसोबत जुन्या वाड्यात पकडले असून त्या दोघांना मी व भाऊ ऋषिकेश यांनी काठीने मारले असल्याचे सांगितले. त्यावर फियादी डॉ. पवार यांनी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. ११ रोजी सकाळी १०.३० वाजता अनुजा हिने फिर्यार्दीला फोन केला. तसेच संबंधित महिलेचा श्वास चालत नाही, तिला ऋषिकेश याने बारामतीतील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले आहे, तेथे डॉक्टरांनी ती महिला मयत झाल्याचे सांगितले. आम्ही तिच्या नातेवाईकांना तुमच्या हॉस्पिटलला घेवून येतो, तुम्ही तिचा मृत्यू ह्दयविकाराने झाल्याचे सांगा, अशी विनंती केली. डॉ. पवार यांनी असे सांगण्यास नकार दिला. दुपारी १२.३० च्या सुमारास आरोपी ऋषिकेश व मयत महिलेचा मुलगा व मुलगी त्या महिलेचे प्रेत परत डॉक्टर पवार यांच्याकडे घेऊन गेले. तेथे पवार यांनी तिचा चेहरा पाहिल्यावर ती चार ते पाच तासांपूर्वीच मृत्यूमुखी पडल्याचे दिसून आले.डॉक्टरांनी त्या महिलेला उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानंतर मृत महिलेच्या मुलाने डॉक्टर पवार यांची भेट घेत माझ्या आईचा मृत्यू नेमका कशाने झाला अशी विचारणा केली. डॉक्टरांनी मृत महिलेच्या मुलालाही शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तद्नंतर संबंधित महिलेला रुग्णवाहिकेतून नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले
दरम्यान या घटनेत संशयितांच्या वडीलांनाही मार लागला होता. त्यांच्यावर डॉ. पवार यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. दि. १९ पर्यंत ते हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्यावेळी त्यांनीही मुलगा व मुलीने मारहाण केल्याचे सांगितले. दि. २२ रोजी डॉ. पवार यांना महिलेच्या मृत्यूसंबंधी शहर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांनी पोलिसांना घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी अधिक चौकशी केली. यावेळी बहिण-भावाने मारहाण केल्याची कबुली दिली. तसेच मृत महिलेचा मोबाईल व वडीलांचे रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.मंगळवारी(दि २३) न्यायालयाने दोघा आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!