महिलेचा खून करून तरुणाची आत्महत्या; नग्नावस्थेत आढळले दोघांचे मृतदेह
पिंपरी चिंचवड : दिघी येथील एका लॉजमध्ये तरुणाने महिलेचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह नग्नावस्थेत आढळले. हा प्रकार गुरूवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आला.
प्रकाश महादेव ठोसर (वय २८, रा. अजंठानगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. तर, ३५ वर्षीय महिलेचा खून झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचे आणि महिलेचे मागील काही वर्षापासून प्रेमसंबंध होते.मयत तरुण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच महिला विवाहित होती. तिला एक मुलगा एक मुलगी आहे. विवाहितेचा पती एका खुन प्रकरणात चार वर्षापासून कारागृहात आहे. प्रकाशसोबत तिचे गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघे नेहमी दिघीतील अथर्व लॉजवर जात असत. बुधवारी (दि. २४) दुपारी तीन वाजता दोघे लॉजवर आले होते. खोलीत दोघात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. त्यात प्रकाशने महिलेचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.
गुरुवारी सकाळी दहा वाजता ते लॉज सोडणार होते. मात्र, त्यांनी लॉज सोडला नाही. त्यामुळे लॉजचे व्यवस्थापक बाळू नवसागर यांनी बाहेरून आवाज दिला. मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांना माहिती देत दरवाजा उघडला असता ही घटना उघडकीस आली. महिला बेडवर मृतावस्थेत पडली होती. तर, प्रकाश छताच्या फॅनला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दोघेही नग्नावस्थेत होते.
या घटनेबाबत दिघी पोलिस स्टेशनला कळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. उत्तरीय तपासणीत मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!