केक न कापल्याने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बंधूंच्या कार्यालयावर केला पेट्रोल हल्ला

पुणे : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील चंद्ररंग डेव्हलपर्स या कार्यालयावर मंगळवारी (दि.23) दुपारी पेट्रोल बॉम्बने हल्ला केला होता.या बॉम्ब हल्ला प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांनी यश आले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. तर दोन अल्पवयीन मुले ताब्यात आहेत. जगताप यांनी केक कापण्यास नकार दिल्याने झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तसेच दहशत निर्माण करण्यासह पैसे उकळण्यासाठीही हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले आहे.

तन्मय रामचंद्र मदने (वय-19 रा. साई श्रद्धा अपार्टमेंट, सुदर्शननगर, पिंपळे गुरुव), विक्रम विजय जवळकर (वय-20 रा. हरिओम बिल्डींग, कासारवाडी), प्रद्युम्न किशोर भोसले (वय-23 रा. साई मिलन बिल्डींग, पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

 

मंगळवारी (ता.२३) दुपारी पावणे तीनच्या सुमारास शंकर जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील चंद्ररंग डेव्हलपर्स अ‍ॅण्ड बिल्डर्स या कार्यालयाच्या दिशेने पेट्रोलच्या बाटल्या फेकल्या. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. आरोपींनी तोंडाला मास्क, गाडीच्या नंबर प्लेटवर चिकटपट्टी लावली होती. त्यामुळे आरोपींना ओळखता येत नव्हते. पोलिसांनी गाडीच्या रंगावरुन आरोपींचा माग काढून त्यांना बेड्या ठोकल्या. विक्रम जवळकर याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आरोपींना दिली होती. विक्रम याच्या घराच्या गोठ्यात या गुन्ह्याचा कट रचण्यात आला होता.

आरोपी प्रद्युम्न भोसले याचा 7 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त ‘मास्टरमाईंड’ असे लिहिलेला केक घेऊन तन्मय मदने व प्रद्युम्न भोसले हे त्यांच्या मित्रासोबत चंद्ररंग डेव्हलपर्स या कार्यालयात शंकर जगताप यांच्या हस्ते केक कापण्यासठी गेले होते. मात्र, शंकर जगताप यांना कामामुळे केक कापता आला नाही. ते केक न कापताच गाडीत बसून निघून गेले. याचा राग प्रद्युम्न याच्या मनात होता. त्यानंतर त्याने जगताप यांच्या विरोधकांकडे जाऊन केक कापला.

चिखलीचा फॉर्म्युला सांगवीत

दीड वर्षापूर्वी चिखली येथे नगरसेवक दत्ताकाका साने यांचे ऑफीस काही गुंडांनी फोडून दहशत निर्माण केली होती. या गुन्ह्यात प्रद्युम्नचा वर्गमित्र सॅमसग अ‍ॅमेट , देवेंन्द्र बिडलान हे सहभागी होते. या गुन्ह्यात दत्ताकाका साने यांच्या राजकीय विरोधक नेत्याचे नाव न घेण्यासाठी त्यांना मोठी रक्कम मिळाली होती. त्याचप्रमाणे या गुन्ह्यात देखील जर तन्मय मदने व त्याचे साथीदार पकडले गेल्यास तोच फॉर्म्युला वापरुन शंकर जगताप यांच्या विरोधकांकडे नाव न घेण्यासाठी मोठ्या रक्कमेची मागणी करायची असे नियोजन आरोपी प्रद्युम्न भोसले व तन्मय मदने यांनी केले होते व नियोजन प्रत्यक्षात आणण्यासाठी मदने याने विक्रम जवळकर व दोन अल्पवयीन मुलांना या कटात सामावून घेतले. त्यानंतर हल्ला हा केला.पेट्रोल बॉम्ब बनविण्यासाठी तन्मय याने ज्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल विकत घेतले. बाटल्या घेतलेले भंगारचे दुकान व लायटर विकत घेतलेली पान टपरी येथे सांगवी पोलिसांचा तपास सुरु आहे.

तन्मयचे वडील डोळ्यांचे डॉक्टर
आरोपी तन्मय मदने हा चांगल्या घरातील मुलगा आहे. त्याचे वडील डोळ्यांचे डॉक्टर आहेत. तन्मय आणि अल्पवयीन मुले, विक्रम जवळकर, प्रद्युम्न भोसले यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सॅमसग अ‍ॅमेट, देवेंन्द्र बिडलान यांच्यावर पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरात गुन्हे दाखल आहेत. भोसले हा त्यांचा वर्गमित्र असल्यानेच इझी मनी व शंकर जगताप यांनी त्याच्या वाढदिवसाचा केक न कापल्याचा राग मनात असल्याने त्याने हा गुन्हा केले.

ही कारवाई आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल तांबे, सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, दिलीप जाधव, पोलीस उपनिरीक्षक येडे, गोसावी, वरुडे, गायकवाड, पोलीस हवालदार नितीन काळे, गणेश धामणगावकर, पोलीस नाईक विजय मोरे, प्रविण पाटील, विवेक गायकवाड, प्रमोद गोडे, सागर सुर्यवंशी, हेमंत हांगे, अनिल देवकर,
विनायक डोळस, विश्वनाथ असवले, नुतन कोंडे यांच्या पथकाने केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.