नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, पाच दिवसातील तिसरा खून

नाशिक : नाशिकमध्ये मागील पाच दिवसात तिसरा खून झाल्याची धक्कादायक घटन  समोर आली आहे . आज सकाळी नाशिकमध्ये सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नाशिक शहर हत्येच्या घटनेनं हादरलं आहे.नाशिकमधील कार्बन नाका परिसरात ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार,शुक्रवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने अमोल यांना फोन करून बाहेर बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करत हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांना शासकीय हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

राजकीय पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे. तसेच शहरातील पोलिसांच्या गस्ती बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये हत्येचे सत्र सुरूच आहे. नाशिकमधील विविध भागात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे, त्यामुळे नाशिकमधील पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

मंडल अध्यक्ष अमोल इघे यांचा खून झाल्यानंतर नाशिक भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. सातपूर पोलीस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. भाजप आमदार राहुल ढिकले,सीमा हिरे  आणि शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह पदाधिकारी ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अमोल इघे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास भाजप पदाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ आणि पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना हटविण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. जोपर्यंत आरोपी गजाआड जात नाही, पालकमंत्री, पोलीस आयुक्त बदलले जात नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार, अशी पवित्रा भाजपने घेतली आहे.

गेल्या ५ दिवसात नाशिक शहरात हत्येची ही तिसरी घटना आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला आरपीआयच्या महिला पदाधिकारी पूजा आंबेकर यांची हत्या करण्यात आली होती.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.