अल्पवयीन मुलीला फुस लावून शारीरिक संबंध त्यात मुलगी राहिली गर्भवती ; आरोपीला २४ तासात अटक

बारामती  :अल्पवयीन मुलीला फुस लावत तिच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवले. त्यात ती गर्भवती राहिली. समाजात चर्चा होईल, या भीतीने तिच्या आईने तिला गर्भपात करण्यासाठी ससून रुग्णालयात दाखल केली. मात्र, पुणे शहर पोलिसांनी याची माहिती बारामती शहर पोलिसांना दिल्यानंतर आरोपीला 24 तासांत अटक केली आहे.

सलीम ऊर्फ सागर इक्‍बाल मुश्रीफ (वय 25, क्‍लिनर रा. गुजीबावी, ता. बारामती, मूळ रा. लक्ष्मीनारायणनगर बारामती), असे बलात्कार करणाऱ्या आरोपीचे आहे. केवळ आरोपीच्या हातावर टॅटूवरून आरोपीला पकडण्यात बारामती शहर पोलिसांना यश आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहरातील एका भागात पीडित मुलगी (वय 15) राहत आहे. मोरगाव रस्त्याकडे एका शाळेत जात असताना तिची एका मुलाबरोबर ओळख झाली. दोन-तीन वेळा तो तिला रस्त्यातच भेटला. त्याने तिला फूस लावले. त्यातून त्यांचे निरा डावा कालव्यालगत काहीवेळा शारीरिक संबंध आले. त्यातून ती गरोदर राहिली. समाजात व बारामतीत चर्चा होईल म्हणून आईने मुलीला ससून रूग्णालयात गर्भपातासाठी दाखल केले.

याबाबत पुढील कारवाई करावी, असे बारामती शहर पोलिसांना येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी कळविले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील व हवालदार कोठे, कांबळे, चव्हाण हे ससून रुग्णालयात पीडित मुलीचा व तिच्या आईचा जबाब नोंद केला.

पीडित मुलीने सांगितले की, मुलीस आरोपीचे नाव, गाव, पत्ता माहित नव्हते. मात्र, त्याच्या हातावर बदाम व सागर, असे गोंदलेले आहे, अशी माहिती पीडितेने दिली. याव्यतिरिक्‍त कोणतीही माहिती पीडित मुलीने व तिच्या आईला देता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी मुलीच्या जबाबवरून (दि.26) गुन्हा दाखल केला. ही मुलगी ससूनमध्ये गर्भपात करण्यासाठी दाखल आहे.

पोलिसांनी मुलीने दिलेल्या वर्णनावरून बारामती शहरांमध्ये तपास सुरू केला. तपास पथकास (दि.29) रात्री आरोपीची माहिती मिळाली. आरोपी सलीम ऊर्फ सागरला ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. त्याच्या हातावर “टॅटू चे वर्णन दिसून आले. त्याला तात्काळ अटक केली.

आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करण्यासाठी डीएनएसारखा शास्त्रोक्त पुरावा उपयुक्‍त ठरणार आहे. पीडित मुलीकडून कोणतेही नाव माहीत नसताना केवळ आरोपीच्या हातावरील “टॅटू’वरुन आरोपीला अटक केली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीचे, आरोपीचे तसेच गर्भाचे डीएनए तपासण्यासाठी रासायनिक प्रयोगशाळेत पाठवणार आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी गुन्हा उघड करण्यासाठी पोलिसांना आदेश दिले होते.

बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे, तुषार चव्हाण, मनोज पवार, दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, बंडू कोठे यांनी तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.