पिंपरी चिंचवडमध्ये 5 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त, चौघांना अटक

पिंपरी चिंचवड : वाकडं पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल पाच लाख 15 हजार 375 रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. तसंच गांजा आणणारे दोघे आणि ज्यांच्या घरात गांजा सापडला ते दोघे अशा चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हा गांजा पिंपरी चिंचवड मध्ये विक्री करण्यासाठी अहमदनगर येथून आणलेला होता. ही कारवाई सोमवारी (दि. 29) सायंकाळी ताथवडे गावात करण्यात आली.

सुनील सुधाकर भापकर (वय 25, रा. काळेवस्ती, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), प्रवीण उर्फ पवन दिलीप गाडे (वय 21, रा. माळेगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), आकाश महादेव खाडप (वय 20, रा. पवारवस्ती, ताथवडे), रविराज उर्फ कन्नड्या राजेंद्र केदार (वय 22, रा. ताथवडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक प्रशांत गिलबिले यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील आणि प्रवीण यांनी अहमदनगर येथून आरोपी आकाश आणि रविराज यांना गांजा विक्रीसाठी आणून दिला. तो आकाश आणि रविराज यांच्या घरात ठेवला असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत आकाश आणि रविराज यांच्याकडून पाच लाख 15 हजार 375 रुपये किमतीचा गांजा जप्त केला.

पोलिसांनी आरोपींकडून साडेनऊ हजार रूपये रोख रक्कम आणि 80 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोनही जप्त केले आहेत. या कारवाईमध्ये पोलिसांनी चार जणांना अटक करत एकूण सात लाख 24 हजार 875 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.