राज्यात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवे नियम; जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना राहावे लागेल 7 दिवस क्वारंटाइन

मुंबई : जगातील 19 देशांमध्ये ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा  शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात आणि महाराष्ट्रात खबरदारी घेतली जात आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मंगळवारी रात्री सांगितले की, ‘जोखीम असलेल्या’ देशांतून राज्यात येणार्‍या प्रवाशांना 7 दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. केंद्र सरकारने ‘जोखीम’ असलेल्या देशांची यादी जाहीर केली आहे.

अद्ययावत यादीनुसार, ‘जोखीम’ देशांमध्ये युरोपीय देश, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल यांचा समावेश आहे. प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, अशा प्रवाशांचे राज्यात आगमन झाल्यानंतर दुसर्‍या, चौथ्या आणि सातव्या दिवशी RT-PCR चाचणीही केली जाईल.

कोणत्याही प्रवाशाला संसर्ग झाल्याचे आढळल्यास त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी त्याला सात दिवस घरातच आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. राज्य सरकारने म्हटले आहे की, केंद्राने 28 नोव्हेंबर रोजी ’ओमिक्रॉन’ च्या दृष्टीने जारी केलेली प्रवास मार्गदर्शक तत्त्वे ’किमान निर्बंध’ म्हणून काम करतील.

यामुळे भारतात वाढली चिंता

दक्षिण आफ्रिका आणि इतर उच्च जोखमीच्या देशांमधून महाराष्ट्रात आलेल्या सहा प्रवाशांची कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. SARS-CoV2 चे नवीन रूप असलेल्या Omicron बद्दलच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने मंगळवारी ही माहिती दिली.

दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांतील हे लोक मुंबई महापालिका, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि पुणे महापालिका हद्दीत आढळून आले आहेत. नायजेरियाहून आलेले दोन प्रवासी पुण्याला लागून असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात सापडले आहेत.

आरोग्य विभागाने सांगितले की, ’सध्या दक्षिण आफ्रिका किंवा इतर उच्च जोखमीच्या देशांमधून राज्यात आलेले सहा प्रवासी आहेत,
ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या सर्वांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हे प्रवासी, COVID-19 साठी पॉझिटिव्ह आले असले तरी, एकतर लक्षणे नसलेले आहेत किंवा त्यांना सौम्य लक्षणे आहेत.

महाराष्ट्रात खबरदारीचे कोणते उपाय?

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या प्रादुर्भावामुळे जग चिंतेत असताना महाराष्ट्रात काय खबरदारी घेतली जात आहे, याविषयी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. –
– कस्तुरबा रुग्णालयात टेस्ट लॅब आहेत. तेथे जेनेटिक सिक्वेन्सिंगचे नमूने तपासायला दिले आहेत. कस्तुरबासारखे लॅब अजून बनवण्याचे काम सुरु आहे.
– परदेशातून आलेल्या व्यक्तींना 7 दिवस क्वारंटाइन करावे लागेल.
– 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुन्हा टेस्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
– सध्या तरी एवढी ‘पॅनिक’ होण्याची गरज नाही, असे WHO ने सांगितले असले तरीही ओमिक्रॉनचा अहवाल आल्यानंतरच यासंबंधी निर्णय घ्यावा लागेल

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.