Anti Corruption Bureau: बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी घेतले ७० हजार, महिला पोलीस उपनिरीक्षक ताब्यात
पिंपरी चिंचवड : बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाखांची लाच मागितली. त्यानंतर तडजोडी अंती सत्तर हजार रुपये स्वीकरताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपनिरीक्षक महिलेसह एका कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले. मात्र, कर्मचाऱ्याने पथकातील सदस्यांना धक्काबुक्की करीत पळ काढला. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षकाला ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगवीत गुरुवारी (दि. २) सापळा लावून ही कारवाई करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक हेमा सिध्दराम सोळुंके (वय २८) यांना ताब्यात घेतले असून सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक बाळकृष्ण देसाई पळून गेले आहेत. याप्रकरणी ४२ वर्षीय पुरुषाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके आणि सहायक उपनिरीक्षक बाळकृष्ण देसाई हे दोघेही सांगवी पोलीस ठाण्यात नियुक्त आहेत. तक्रारदार पुरुषाच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल आहे. त्या अर्जाची चौकशी उपनिरीक्षक सोळुंके करीत होत्या. अर्जावरून बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ व २६ नोव्हेंबर रोजी पडताळणी केली.
उपनिरीक्षक हेमा सोळुंके यांच्या सांगण्यावरून सहायक उपनिरीक्षक देसाई यांनी तक्रारदाराकडे एक लाखाची मागणी केली व तडजोडीअंती ७० हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार गुरुवारी (दि. २) सहायक उपनिरीक्षक देसाई यांनी तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची लाच स्वीकारली.
तक्रारदाराकडून लाच स्वीकारण्यास उपनिरीक्षक सोळुंके यांनी सहमती दर्शवली. त्यानुसार सहायक पोलीस उपनिरीक्षक देसाई यांनी तक्रारदाराकडून ७० हजारांची लाच स्वीकारली. त्यावेळी सापळा लावलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक त्यांना पकडण्यासाठी गेले. मात्र, आरोपी देसाई हा लाचलुचपत विभागातील सदस्यांना धक्का देवून दुचाकीवर लाच घेतलेल्या रक्कमेसह पळून गेला.तर सोळुंके याना पोलिसांनी पथकाने ताब्यात घेतले आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!