हेअर ट्रान्सप्लांट करणार्या तोतया डॉक्टरसह तिघांना अटक
पुणे : हेअर ट्रान्सप्लांट करून नागरिकांची मागील तीन वर्षापासून फसवणूक करणार्या तोतया डॉक्टरसह तिघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली. कोणत्याही प्रकारची पदवी नसताना नागरिकांना वैद्यकीय व्यवसायिक असल्याची बतावणी करत हे त्रिकूट हा उद्योग करत होते. गेल्या तीन वर्षात त्याने 300 पेक्षा अधिक नागरिकांवर केश प्रत्यारोपण केल्याचे आढळून आले आहे.
तोतया डॉक्टर शाहरुख ऊर्फ समीर हैदर शाह (वय 24, रा. गणेशनगर, वडगाव शेरी), परिचारिका म्हणून काम करणारी महिला पंचशिला काशिनाथ रोडगे (वय.30,रा. वडगावशेरी) व चैताली भरत म्हस्के (वय.30,रा. वडगावशेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा गलांडे यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. न्यायालयाने तिघांना आठ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, वरील आरोपी विमाननगर या परिसरात लुंकड क्लायमॅक्स या इमारतीमध्ये डॉ. हेअर मॅजिका नावाच्या क्लिनिकमध्ये कोणताही वैद्यकीय परवाना किंवा वैद्यकीय डिग्री नसताना लोकांच्या जिवानिशी खेळून हेअर ट्रान्सप्लांट प्रक्रिया करीत होते. याबाबतची माहिती गुन्हे शाखा युनिट-४ चे पोलीस हवालदार नागेशसिंग कुंवर यांना मिळाली. त्या माहितीची पडताळणी करून युनिट-4 चे पथक, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती रेखा गलांडे, त्यांचे पथक व अन्न सुरक्षा निरीक्षक यांनी त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी वरील तिन्ही आरोपींपैकी एकाकडेही वैद्यकीय डिग्री नव्हती. तसेच त्यांच्या क्लिनिकमध्ये शेड्युल एच टाईप ड्रग, हेअर ट्रान्सप्लांटकरिता लागणारी उपकरणे इत्यादी साहित्य पोलिसांना सापडले. आरोपींनी येणाऱ्या ग्राहकांना आम्ही हेअर प्लांटचे तज्ज्ञ डॉक्टर आहोत, असे भासवून त्यांच्यावर हेअर प्लांटची शस्त्रक्रिया करून अनेक ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय कायदा कलम 33(2) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, गुन्हे-२ चे सहा. पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, सहा.पोलीस निरीक्षक शोभा क्षीरसागर, पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार महेंद्र पवार, राजस शेख, नागेशसिंग कुंवर, संजय आढारी, दत्ता फुलसुंदर, सागर वाघमारे यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!