बांधकाम व्यावसायिक समीर मनूर खून प्रकरणी तिघांना अटक, धक्कादायक कारण समोर
पुणे : काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष व बांधकाम व्यावसायिक समीर हुसेन मनूर याची भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात होती . या खून प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा तिघांना अटक केली असून त्यांच्याबरोबर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.आर्थिक वादातून त्यांनी समीर ऊर्फ लालबादशाह हुसेन मनूर (वय ३२, रा. काळुबाईनगर, आंबेगाव बुद्रुक) याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मेहबुब सैफान बलुरंगी (वय ३३, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा), निलेश सुनिल कुंभार (वय ३०, रा. लक्ष्मी कॉलनी, भेकराईनगर, हडपसर) आणि सुफियान फैयाज चौरी (वय १९, रा. लक्ष्मीनगर, पर्वती पायथा) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी समीर याचे वडिल हुसेनसाब महंमदसाब मनुर (वय ६७, रा. काळुबाईनगर, आंबेगाव बुद्रक) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,समीर हा पूर्वी जनता वसाहत येथे रहायला होता.मेहबुब याची जनता वसाहतीत टपरी आहे. तो व्याजाने पैसे देत असे. तसेच भिशीही चालवित असे. समीरला मेहबुब याने संतोषनगर येथील प्लॉटच्या बांधकामाचे काम दिले होते. त्या व्यवहारापोटी मेहबुब याने पाच लाख रुपये दिले होते.
त्यापैकी अडीच लाख रुपये समीरने परत केले होते. उरलेले अडीच लाख रुपये परत करावे, अशी मेहबुब समीरकडे वारंवार मागणी करीत होता. पण उरलेले पैसे देण्यासाठी मात्र समीर टाळाटाळ करू लागला. विशेष म्हणजे, मृत समीर अंगावर भरपूर सोनं घालून परिसरात ‘गोल्डन मॅन’ बनून फिरतो. पण आपले अडीच लाख रुपये देत नाही .यामुळे मेहबूबचा समीरवर राग होता. यातूनच संतापलेल्या मेहबूब याने दोन महिन्यांपूर्वी समीरची गळ्यातील सोन्याची चैन ओढण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे दोघांमधील वाद विकोपाला गेला.
या आर्थिक व्यवहारावरुन मेहबुब याने इतर तिघांशी संगनमत करुन कट रचला. समीर हा सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बुलेटवरुन दत्तनगर येथील कार्यालयात निघाला होता.तो चहा पिण्यासाठी चंद्रभागा चौकात आला असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर ६ गोळ्या झाडल्या. डोक्यात गोळी लागल्याने समीर बुलेटवरच पडला. त्यात त्याचा जागीच मृत्यु झाला. भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!