हौसेसाठी पिस्तुल बाळगणाऱ्या दोघांना अटक, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

पुणे: सुमारे दीड वर्षापूर्वी खून झालेल्या गुन्हेगाराकडून हौसेपोटी पिस्तुल घेऊन ते राजरोजपणे मिरविणाऱ्या दोघा व्यावसायिकाना पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडुन २ गावठी पिस्तुल आणि ४ जीवंत काडतुसे असा १ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.

संतोष अंकुश डिंबळे (वय २१, रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर) आणि उमेश दिलीप वाव्हळ (वय २५, रा. बांडेवाडी, खेड शिवापूर, ता. हवेली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

संतोष डिंबळे याचे कात्रज येथील खाऊ गल्लीत व्यवसाय आहे. तर उमेश वाव्हळ याचे नसरापूरला दुकान आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार प्राण येवले यांना पुणे-सातारा रोडवरील कोंढणपूर चौकातील महामार्गावरील पुलाखाली दोघे जण थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले.  त्यांची झडती घेतली असता दोघांच्या कमरेला प्रत्येकी १ गावठी पिस्तुल व मॅगझिन व त्यामध्ये प्रत्येकी २ जिवंत काडतुसे असे २ पिस्तुले व ४ जिवंत काडतुसे असा १ लाख ४०० रुपयांचा माल मिळून आला.

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना ही पिस्तुले प्रविण मोरे (रा. शिवरे ता. भोर) याने ठेवायला दिली असल्याचे सांगितले आहे. प्रविण मोरे याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल होता. कोरोनामुळे पॅरोलवर तो कारागृहातून बाहेर आल्यावर त्याचा जुलै २०२० मध्ये चौघांनी कोयत्याने वार करुन खून केला होता.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.