पत्नीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या ; तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तिसऱ्या मजल्यावरून पडून पती गंभीर जखमी

लोणी काळभोर : हवेली तालुकयातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील काकडे मळा परिसरात एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात पती तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.  ही घटना रविवारी (ता. 12) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. महिलेने आत्महत्या का केली याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

अश्विनी रामेश्वर लाखे (वय- 28 रा. काकडे मळा, थेऊर, ता. हवेली मूळ रा. गेवराई, जिल्हा बीड ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर रामेश्वर हनुमंत लाखे, (वय-32 ) हे जखमी पतीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड येथील दाम्पत्य सुमारे ५ वर्षापुर्वी थेऊर येथे राहायला आले होते. त्यांनी आता जागा घेऊन येथे तीन मजली घरही बांधले आहे. रविवारी सायंकाळी महिलेची दिड वर्षाची मुलगी घरात रडत असल्याचे शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आले. परंतु दरवाजा आतून बंद होता. मुलीचा रडण्याचा आवाज थांबत नव्हता. हे सर्व पती रामेश्वर याला समजल्यानंतर तो तातडीने टेरेसवर गेला. वरून तिसऱ्या मजल्यावर उतरल्यावर अश्विनी हिने खिडकीला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्याने लगेचच साडीची गाठ सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी स्वतःचा तोल सांभाळता न आल्याने खाली पडला. या घटनेत पती आपल्या पत्नीला वाचवू शकला नाही. पण तो खाली पडल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे. पतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच थेऊर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, पोलीस हवालदार नरेंद्र सोनवणे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी उपस्थित रहिवाशांच्या सहाय्याने दरवाजा तोडला. परंतु त्यापूर्वीच अश्विनी यांचा मृत्यू झाला होता.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.