दहशत पसरविणाऱ्या सराईत गुंड एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 51 जणांवर कारवाई
पुणे : पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 51 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार शाहरुख उर्फ मुन्ना सलीम शेख (वय-19 रा. गल्ली नं. 07, आंबेडकरनगर मार्केटयार्ड, पुणे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहेत. मुन्ना शेख याला एमपीडीए कायद्यान्वये औरंगाबाद कारागृहात एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे.
मुन्ना शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तलवार, कोयता यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने जबर दुखापत करणे, चोरी, विनापरवाना हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 03 गंभीर गुन्हे मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन गुन्हेगारावर एमपीडीए अॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले. मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे , पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी ही कामगिरी केली.
पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 51 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यानुसार गुन्हेगारांवर मोक्का , तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!