पुण्यात तलवारीने वार करुन तरुणाचा खुन ; आज होणार होता साखरपुडा
पुणे : दुचाकीवरून बहिणीला सोडण्यासाठी आलेल्या तरुणावर तिघांनी तलवारीने वार करून खून केला. ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता कर्वेनगरमधील शक्ती चौक परिसरात घडली. खूनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
अनिल राजेंद्र जाधव (वय २१, रा. डहाणुकर कॉलनी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अनिल जाधव हा याला दोन बहिणी असून एक कर्वेनगर येथे राहते, तर दुसरी डहाणूकर कॉलनी परिसरात राहते. अनिल याचा सोमवारी साखरपुडा होता. त्याची बहीण फक्कड हॉटेल येथे स्वयंपाकी म्हणून काम करते. तिला सोडायला अनिल दुचाकीवरुन लक्ष्मीनगर परिसरात आला होता. त्यानंतर तो पुन्हा घरी जात होता. शक्ती चौक येथे तो आला असताना तिघा जणांनी अचानकपणे त्याच्यावर तलवारीने डोक्यावर, खांद्यावर सपासप वार केले. तेव्हा त्याने दुचाकी सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. काही अंतर तो धावत गेला. त्याच्यामागोमाग हल्लेखोरांनी पाठलाग करुन त्याच्यावर वार केले. त्यात तो तेथेच कोसळला. तेथेच त्याचा मृत्यु झाला. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. पाठोपाठ अलंकार पोलीस व गुन्हे शाखेचे पोलीस पथक घटनास्थळी पोहचले.
दरम्यान, अनिल याचा सोमवारी साखरपुडा होता. त्याच्या अगोदरच त्याचा खून झाल्याने जाधव कुटुंब हादरून गेलं आहे. या तरुणाच्या खुनामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!