सातारा हादरले! सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून
सातारा : पाटण तालुक्यातील रवले- सुतारवाडी (ता. पाटण) येथे सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची संतापजनक घटना घडली आहेत. तसेच डोंगरातील झाडाझुडपात तिचा मृतदेह टाकून देण्यात आला होता. आज, गुरूवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पाटण पोलिसांनी संशयित नराधमाला ताब्यात घेतले असून या घटनेने पाटणसह सातारा जिल्हा आणि राज्यभरात खळबळ उडाली आहे.
संतोष थोरात (रा. रुवले) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेने रवले- सुतारवाडीसह ढेबेवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील रवले- सुतारवाडी येथील पीडित मृत अल्पवयीन मुलगी बुधवारी (दि. 29) सायंकाळी बेपत्ता झाली होती. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत संबंधित मुलीच्या कुटुंबीय, नातेवाइकांनी तिचा शोध घेतला. परंतु, ती सापडली नाही. त्यानंतर आज गुरुवारी (दि. 30) रोजी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास रवले- सुतारवाडी येथे घटनेतील पीडित मृत मुलीच्या घरापासून सुमारे 500 मीटर अंतरावर ओढ्यात तिचा मृतदेह आढळला.
याबाबतची माहिती मिळताच ढेबेवाडी, पाटण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच गुरुवारी (दि.30) रोजी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे किशोर धुमाळ, कराडचे उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी भेट देऊन पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी संशयितास फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टीने पोलीस योग्य तो तपास करून न्यायालयासमोर पुरावे सादर करतील असे सांगितले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!