जुन्या भांडणाचा राग मनात धरून कुऱ्हाडीने वार करून ५० वर्षीय महिलेचा खून ; बारामती हादरले

बारामती: जुन्या भांडणाचा राग मनात धरून कऱ्हावागज (ता.बारामती) येथील ५० वर्षीय महिलेचा कुऱ्हाडीने खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि ९) दुपारी घडली. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

गंगूबाई तात्याराम मोरे (वय ५०, रा. कऱ्हावागज, ता. बारामती) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत किरण दादा मोरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत खून झालेल्या गंगूबाई यांची सून प्रमिला प्रमोद मोरे (वय ३०, रा. कऱ्हावागज) यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गेल्या अडीच वर्षांपूर्वी फियार्दीच्या शेजारी राहणारे भावकीतील किरण दादा मोरे यांची फियार्दीच्या सासू-सासऱ्यांबरोबर शेळ्या अंगणात जाण्याच्या कारणावरून भांडणे झाली होती. त्यावेळी भावकीतील लोकांनी दोन्ही बाजूंची समजूत काढत भांडण मिटवले होते. त्यामुळे पोलिसात तक्रार देण्यात आली नव्हती.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

तेव्हापासून ही दोन्ही कुटुंबे एकमेकांशी बोलत नव्हती. रविवारी(दि. ९) दुपारी दीड वाजता फिर्यार्दीने पती प्रमोद, सासू गंगूबाई यांच्यासमवेत  जेवण केले. अर्ध्या तासाने पती प्रमोद हे बारामतीला कामावर निघून गेले. सासू गंगूबाई या नातू सार्थक व जीवन यांना सोबत घेत गप्पा मारण्यासाठी घराजवळील कांतीलाल मोरे यांच्या पत्राशेडजवळ गेल्या होत्या. अडीचच्या सुमारास किरण हा हातात कुऱ्हाड घेऊन पत्राशेडकडे जाताना दिसला. त्याने तेथे जात गंगूबाई यांच्या डोक्यात पाठीमागून कुऱ्हाडीने वार केला.

या घटनेत गंगूबाई या जमिनीवर कोसळल्या. हा प्रकार पाहताच फिर्यादीने आरडाओरडा करीत धावत जात आरोपीच्या हातातील कुऱ्हाड हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याने त्यांना बाजूला ढकलून देत गंगूबाई यांच्या छातीवर पुन्हा कुऱ्हाडीने वार केला. तुझ्या सासूचा कसा काटा काढला, तु पुढे ये, तुझा पण काटा काढतो असे धमकावत तो हातातील कुहाड घेत तो फियादीच्या अंगावरही धावून गेला.

त्यानंतर आरोपी पायातील चप्पल जागीच सोडून माळरानाच्या दिशेने पळून गेला. फिर्यादीने पतीला फोनवरून याची कल्पना दिली. गुन्हा घडल्यानंर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. फिर्यादीच्या कुटुंबाने यावेळी किरण याला पकडण्याची मागणी केले. जोपर्यंत आरोपीला पकडले जात नाही तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नसल्याची भूमिका घेतली. अखेर पोलिस प्रशासनाने समजूत काढल्यानंतर मृतदेह बारामतीत सरकारी रुग्णालयात हलविण्यात आला. पोलिसांनी देखील तपास करीत  किरण मोरे याला अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक महेश विधाते यांनी ही माहिती दिली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.