जिल्हा प्रशासनाने लसीकरण वाढवावे, सुविधा तयार ठेवाव्या – मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई – गेल्या दोन दिवसांपासून कोविड रुग्णसंख्या कमी होत आहे असे जे चित्र निर्माण होत आहे ते बरोबर नसून दैनंदिन रुग्णवाढ झपाट्याने होतच असून जानेवारी शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल असे सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्या सादरीकरणात सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चिंता व्यक्त करण्यात आली.
राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा वापर हळूहळू वाढतो आहे. आता हा वापर दररोज सुमारे ४०० मेट्रिक टन इतका वाढला आहे, दररोज ७०० मेट्रिक ऑक्सिजन लागला तर राज्यात अधिक कडक निर्बंध लावावे लागू शकतील हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने लसीकरण वाढवावे तसेच इतर नियोजन तयार ठेवावे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
मुंबई व इतर प्रमुख शहरांशिवाय आता हळूहळू राज्याच्या ग्रामीण भागात संसर्ग वाढत आहे. आज रुग्णालयात दाखल ज्या रुग्णांनी दोन्ही लसी घेतल्या आहेत त्यांना उपचारादरम्यान ऑक्सिजनची गरज भासत नाही असे दिसते. यूके, अमेरिका या देशांतही आता रुग्णालयांमध्ये संख्या वाढून ताण यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे बेसावध राहू नका असे मुख्यमंत्री म्हणाले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!