कोल्हापूरत व्हेल माशांची सव्वा तीन कोटींची उलटी जप्त; सहा जणांना अटक
कोल्हापूर –:व्हेल माशाची उलटी विक्री करणाऱ्या सांगलीतील टोळीला कोल्हापुरात वन विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी सापळा रचून पकडले. ही कारवाई न्यू पॅलेस परिसरात करण्यात आली. टोळीतील सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे सव्वातीन कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी तसेच मोटारकार, दुचाकी व मोबाईल असा सुमारे साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
किस्मत दस्तगीर नदाफ (रा. इस्लामपूर), विश्वनाथ वामन नामदास (रा. मोरेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली), अस्लम सिराज मुजावर (रा. बनापूर, ता. खानापूर), रफिक शौकत सनदी (रा. मिरज, ता. मिरज, जि. सांगली), आलमशाह मुल्ला, उदय जाधव (सर्व रा. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सांगली जिल्ह्यात व्हेल माशांची उलटी विक्री करणारी टोळी अस्तित्वात असल्याची माहिती कोल्हापूर वन विभागास मिळाली. या माहितीच्या आधारे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्राहक असल्याचे भासवून त्या टोळीशी संपर्क साधला. त्यानंतर ते कोल्हापुरात येणार असल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांची मदत घेतली.
ही टोळी दसरा चौकात चर्चा करण्यासाठी आली. त्यावेळी वनक्षेत्रपाल आर. एस. कांबळे यांनी ग्राहक बनून त्यांची भेट घेतली. यावेळी कांबळे यांनी त्यांना बॅगेतील पैसेही दाखवले. त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना व्हेल माशाची उलटी घेऊन न्यू पॅलेस परिसरात बोलावले. त्यावेळी वनविभागाचे अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी सहा जणांना सापळा रचून पकडले. त्यांच्याकडील व्हेल माशाच्या उलटीसह सुमारे साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अधिक तपास वनविभाग करीत आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!