यवतमध्ये एटीएम फोडणारी टोळी जेरबंद; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
पुणे : यवत आणि कुरकुंभ भागातील बॅंकेचे एटीएम गॅसकटरच्या सहाय्याने फोडून एकूण 23 लाख 80 हजार 700 रुपये चोरून नेणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींनी यु ट्युबवरुन घरफोडी व ए टी एम चोरी कशी करायची याची माहिती गोळा केली. त्यासाठी लागणारे साहित्य ऑनलाईन मागविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.याप्रकरणात तीघांना अटक करून 10 लाख रुपयांची रोख रक्कम, दुचाकी आणि एटीएम मशीन फोडण्यासाठी वापरलेले साहित्य आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
असून अजय रमेशराव शेंडे (वय 32, रा. सहजपूर, ता. दौंड), शिवाजी उत्तम गरड (वय 25, रा. करंजी, ता. रिसोड, जि. वाशिम) आणि ऋषिकेश काकसाहेब किरतिके (वय 22, रा. देवधानुरा, ता. कळंब, जि उस्मानाबाद) या तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार उपस्थित होते.
यवत येथील महाराष्ट्र बँकेची ए टी एम कापून चोरट्यांनी २३ लाख ८० हजार७०० रुपये चोरुन नेले होते. १७ जानेवारी रोजी पहाटे अडीच ते चार वाजण्याच्या दरम्यान हा दरोडा टाकण्यात आला होता. त्याअगोदर १६ जानेवारीला कुरकुंभ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए टी एम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.
ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार व त्यांच्या पथकाने या संपूर्ण परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली,तेव्हा दोन – तीन मोटारसायकलवरुन आरोपी जाताना दिसून आले. त्यातील एका मोटारसायकलच्या मागे गॅस सिलेंडर लावलेला दिसून आला. त्यावरुन शोध घेऊन पोलिसांनी या तिघांना पकडले आहे. यवत व कुरकुंभ येथील एटीएम चोरी तसेच लातूर जिल्ह्यातील गातेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ए टी एम मशीन गॅस कटरने कापून त्यातील ७ लाख ६७ हजार रुपये चोरुन नेले होते. वाशीम येथील घरफोडी करुन १ लाख ८४ हजार रुपयांचे १२ तोळे सोने व लॅपटॉप चोरुन नेले होते. हे चार गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
यातील आरोपी ऋषिकेश किरतिके याच्या भावाला मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याला सोडविण्यासाठी वकिल व अन्य बाबींसाठी त्याचा दीड लाख रुपये खर्च झाला होता. त्यामुळे तो या टोळीत सहभागी झाला होता. अजय शेंडे हा सहजपूर येथे राहणारा असून तो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. तो १२ वी पास आहे. ऋषिकेश हा कामासाठी त्याच्याकडे येत होता. यातील आरोपी शिवाजी गरड याचीही अजय शेंडे याच्याशी कामासाठी ओळख झाली होती. गरड व शेंडे यांनी पैसे कमविण्यासाठी घरफोडी करण्याचा व ए टी एम चोरी करण्याचा प्लॅन तयार केला. त्यानुसार अजय शेंडे याने यु ट्युबवरुन घरफोडी, ए टी एम चोरी कशी करावी याची माहिती गोळा केली. त्या करीता लागणारे साहित्य ऑनलाईन मागवून घेतले होते. या टोळीवर उघडकीस आलेल्या चार गुन्ह्याव्यतिरिक्त ३ चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!