उच्चशिक्षित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जीपमध्ये बलात्कार , पिंपरी चिंचवडमधील घटना
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड परीसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नामांकित ई-कॉमर्स कंपनीत व्यवस्थापक असलेल्या उच्चशिक्षित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जीपमध्ये लैंगिक अत्याचार केला. तसेच विश्वास संपादन करून आठ लाख रुपये घेतले. ही घटना रहाटणी आणि वाकड येथे 23 जुलै ते 7 ऑक्टोबर 2021 या कालाधीत घडली.
आश्विक शुक्ला (रा. बालेवाडी, पुणे) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पीडित 30 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित महिला उच्चशिक्षित असून नामांकित ई-कॉमर्स कंपनीत व्यवस्थापक आहे. जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवरून फिर्यादीची आणि आरोपीची ओळख झाली. सेन्ट्रल मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर ऍण्ड फार्मर वेल्फेअर येथे डायरेक्टर म्हणून नोकरीला आहे, असे आरोपीने सांगितले. तसेच लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
माझ्याकडे एक बिझनेस प्लॅन आहे. कस्टममधून आलेल्या वस्तू कमी किमतीत घेऊन त्यांची विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यासाठी 40 लाख रुपयांची आवश्यकता असून सध्या 30 लाख रुपये आहेत. व्यवसायासाठी आणखी 10 लाख रुपयांची आवश्यकता आहे, असे आरोपीने फिर्यादीला सांगितले. तसेच 10 लाख रुपयांची फिर्यादी महिलेकडे मागणी केली. त्यानुसार फिर्यादी महिलेने आरोपीला आठ लाख रुपये दिले.
दरम्यान, आरोपीने रहाटणी तसेच वाकड येथे फिर्यादी महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. वाकड येथील एका हॉटेलच्या पाठीमागे एका जीपमध्ये देखील अत्याचार केले. पीडित फिर्यादी महिलेने आरोपीला दिलेले आठ लाख रुपये परत मागितले असता आरोपीने पैसे परत न करता फिर्यादी महिलेची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!