गाडी बाजूला काढ म्हटल्यावर १५ ते १७ जणांच्या टोळक्याचा कुटुंबावर कोयत्याने हल्ला ; लोणी काळभोरमधील घटना
लोणी काळभोर : वडिलांच्या दशक्रियाविधीसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी चारचाकीमध्ये निघालेल्या माजी सैनिकाने रस्त्यावर असलेली दुचाकी बाजूस काढण्यास सांगितली. याचा राग आल्याने तब्बल १५ ते १७ जणांच्या टोळक्याने ५ ते ६ पाहुण्यांसह कुटुंबावर कोयत्याने हल्ला करून बेदम मारहाण केली. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) येथील माळी मळा परिसरात शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.
याप्रकरणी श्रीनिवास नानासाहेब जगताप (वय ३०, रा. माळीमळा, महात्मा फुले नगर, लोणी काळभोर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश भोसले, अभिजीत उर्फ दिगंबर पवार, ओम लिंगरे, साहिल बारसकर, गौरव धांदे, ॠषिकेश पाटोळे, सोन्या गायकवाड, अमित सोनवणे, विशाल आण्णासाहेब जाधव, राम म्हस्के, ओंकार जोगदंड व इतरांचे विरोधात दहशत निर्माण करीत कोयते उंचाविणे, कोयते मारण्याचे भय दाखविणे, जिवे ठार मारण्याच्या उददेशाने कोयता हत्यारांनी मारहाण करुन जखमी करणे या कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास जगताप याचे वडिलांचा दशक्रिया विधी २२ जानेवारी रोजी असल्याने २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारांस त्यांचे लहान बंधू निवृत्त सैनिक अक्षय हे आई उषा हिस घेऊन दशक्रिया विधीकरिता लागणारे सामान आणण्याकरीता चारचाकीतून लोणी काळभोर गावात निघाले होते. त्यावेळी तेथे राहणारे गणेश भोसले व अभिजीत (पुर्ण नांव माहित नाही) यांनी रस्त्यात त्यांची ज्यपिटर मोपेड उभी केली होती. त्यांना काढण्यास सांगितली असता, त्यांनी मुददाम भांडण उकरून काढण्याच्या व दहशत निर्माण करण्याच्या उददेशाने पार्क केलेली मोपेड रस्त्यात पुर्णपणे आडवी लावून रस्ता अडविला.
दुचाकी बाजुला न करता दादागिरीची भाषा सुरु केली. शिवीगाळ करत मारुन टाकेन. माझ्यावर ऑलरेडी हापमर्डर व मर्डरच्या केसेस आहेत असे म्हणून मोबाईल वरुन फोन लावत अमित पोरं घेऊन ये. इथं दोघा तिघांना कोयतेच टाकू असे म्हणून त्याने अक्षय व श्रीनिवास यांचेशी हाताने झटापटी केल्या. आई मध्ये पडल्याने, तिच्या अंगावर धावून जाऊन तिलाही मारहाण केली. त्यानंतर ते मोपेड चालु करुन निघून गेले.
दरम्यान, शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्रीनिवास जगताप यांच्या घरी गणेश भोसले, अभिजित हे दोघेजण १५ ते १७ अनोळखी व्यक्तींसोबत कोयते घेऊन गेले. त्यावेळी हातातील कोयते बघून स्थानिक लोक घरात निघून गेले. तसेच, श्रीनिवास यांच्या वडिलांच्या दशक्रियेसाठी आलेले पाहुणे कोयत्याच्या दहशतीमुळे घरात पळून जाऊ लागले. मात्र, टोळक्याने जगताप कुटुंबीयांसह पाहुण्यांवर कोयत्याने हल्ला केला. त्यात ५ ते ६ जण जखमी झाले आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!