सासूचा खून करुन अमरावतीतून फरार झालेल्या आरोपीला पुण्यात अटक
पुणे : सासूचा खून करुन अमरावती फरार झालेल्या आरोपी जावयाला पुणे पोलिसांच्या विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. दिनेश भानुदास भोरखडे (वय-31 रा. पेठईतबारपुर पो. दर्यापुर जि. अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील टाकरखेडा पूर्णा येथे आरोपी जावयाने सासरवाडीत येऊन सासू व पत्नीशी शुल्लक कारणावरून वाद घालून सासूवर कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये सासू रुक्माबाई विनायक इंगळे (वय-45) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पळून गेला.
विमानतळ पोलिसाना माहिती मिळाली की, अमरावती येथे सासूचा खून करुन फरार झालेला आरोपी दिनेश भोरखडे हा ट्रॅव्हल्स बसने येरवडा येथे येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सासूचा खून केल्याची कबुली दिली. याबाबत अमरावती ग्रामीण पोलिसांच्या पूर्णा पोलीस ठाण्यातआरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी अमरावती पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!