पिंपरीत तरुणाला जमिनीवरची बिस्किटे खायला लावणाऱ्या भाईचे मुंडन करून पोलिसांनी काढली धिंड
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरामध्ये का अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. “मला भाई का म्हणाला नाही” म्हणून गाव गुंडांच्या टोळक्याने एका तरुणाला इमारतीच्या टेरेसवर नेऊन, कमरेच्या बेल्टने व लाठ्या-काठ्यांनी व बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जमिनीवर बिस्किटे टाकून कुत्र्याप्रमाणे (Dog) ती बिस्किटे खाण्यास भाग पाडले. थेरगाव येथील गणेशनगर येथे मंगळवारी (दि. २५) रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला होता. याप्रकरणातील ‘भाई’ दोन साथीदार आरोपींना अटक करून वाकड पोलिसांनी त्यांचे मुंडन करून रविवारी (दि. ३०) त्यांची गणेशनगर परिसरातून धिंड काढली.
अजित उर्फ आदित्य सुनील काटे (वय २०, रा. ताथवडे), प्रकाश भिवा इंगोले (वय २१, रा. काळाखडक, वाकड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह गंग्या उर्फ रोहन वाघमारे (रा. थेरगाव), प्रशांत आठवले (रा. शिवकाॅलनी, गणेशनगर, थेरगाव), व तीन अल्पवयीन मुले यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील अल्पवयीन तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी २० वर्षीय तरूणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहन याने फिर्यादी तरूणाला मोबाईलवर कॉल करून शिवीगाळ केली आणि भेटण्यास बोलविले. त्यानुसार, तरूण मंगळवारी (दि. २५) रात्री साडेदहाच्या सुमारास गेला. तू मला शिव्या का दिल्या, मी या एरियाचा भाई आहे, माझ्या नादी कोणी लागले तर मी कोणाला सोडणार नाही, अशी धमकी आरोपी रोहनने दिली. तसेच फिर्यादी तरूणाला कमरेच्या बेल्टने मारहाण करत जमीनीवर टाकलेली बिस्किटे खाण्यास भाग पाडले. इतर आरोपींनीही तरूणाला शिवीगाळ करत मारहाण केली. यामध्ये फिर्यादी तरुण जखमी झाला.
तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच आरोपी काटे आणि इंगोले यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचे मुंडन केले. तसेच तपासकामी त्यांना रविवारी गणेशनगर परिसरात नेले. आरोपींची ही धिंड पाहण्यासाठी परिसरात गर्दी झाली होती.
संबंधित तरूणाच्या तक्रारीवरून वाकड पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आणि ज्या ठिकाणी तरूणाला बिस्कीट उचलायला लावले त्याच ठिकाणी तीन आरोपींची धिंड काढली. पोलिसांनी तिन्ही आरोपींचे मुंडन करून घटना घडलेल्या ठिकाणापासून परिसरात त्यांची धिंड काढली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!