अभिनेता बनण्याचं स्वप्न भंगल्याच्या नैराश्यातून विहिरीत उडी मारून तरुणाची आत्महत्या
पुणे : अभिनेता बनून चित्रपटात काम करण्याचं स्वप्न भंगल्यानं एका तरूणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील फलटण तालुक्याच्या गोखळी येथे गुरुवारी (3 फेब्रुवारी) रोजी ही घटना उघडकीस आली आहे. नैराश्यातून संबंधित तरुणाने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितलं आहे. अतुल शिंदे असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अतुल हा आपल्या कुटुंबियांसह पुण्यातील बारामती तालुक्याच्या गुणवडी येथील रहिवाशी होता. त्याला अभिनेता बनून चित्रपटात काम करायचं होतं. मात्र, घरच्या परिस्थितीमुळे त्याला गॅरेजमध्ये काम करावं लागलं. त्यामुळे तो नैराश्यात गेला. त्यानंतर त्यानं टोकाचं पाऊल उचलत विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान 1 फेब्रुवारीला अतुल बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी बारामती पोलीस ठाण्यात दिली होती.
दरम्यान, यानंतर गुरुवारी फलटण तालुक्यातील गोखळी गावातील एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळला आहे. याप्रकरणी बारामती पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे. या प्रकरणी अधिक तपास बारामती पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!