गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन, वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Lata Mangeshkar Death News: गेल्या आठ दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘स्वर्गीय सुरांनी’ विराम घेतला. भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, लतादीदींची तब्येत काल (शनिवारी) अचानक बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. लतादीदी उपचाराला प्रतिसादही देत होत्या, मात्र रविवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फक्त देशच नाही, तर जगभरातील चाहत्यांना या बातमीने सुन्न केले आहे.
मुंबईतील पेडर रोड भागातील लता मंगेशकर यांच्या प्रभुकुंज निवासस्थानी दुपारी 12.30 वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.
भारतरत्नसह विविध पुरस्कारांनी सन्मान
लता मंगेशकर यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी अनेकांना प्रार्थना केली होती. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना ‘लता दीदी’ म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.
92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळील अर्थात ‘प्रभू कुंज’ येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याआधीही अनेकदा त्यांनी या रुग्णालयात उपचार घेतले होते.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!