बारामतीत महावितरण अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या

बारामती : बारामती शहरातील महावितरण सहाय्यक अभियंत्याने स्वत:च्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. गेल्या दोन दिवसांपासून ते कामावर आले नव्हते. उर्जा भवन कर्मचारी वसाहतीतील आपल्या सदनिकेत त्यांनी गळफास घेत जीवनप्रवास संपविला.मनीष माधवराव दंडवते ( वय ४३ )असे या अभियंत्याचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दंडवते हे बारामती येथील ऊर्जा भवन वसाहत येथे राहत होते. मागील दोन दिवसांपासून ते कामावर आले नव्हते. सकाळी त्यांचा डबेवाला डबा देण्यासाठी आला असता दरवाजा उघडला नाही. मात्र, दंडवते यांनी दरवाजा उघडला नाही. प्रतिसाद न मिळाल्याने डबेवाल्याने तावदान आतून डोकावून आत पाहिले. यावेळी त्याला दंडवते यांनी किचनमध्ये नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे  निदर्शनास आले. त्यानंतर डबेवाल्याने पोलीस ठाण्यामध्ये खबर दिली.

पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांनी जाऊन पाहणी केली. दंडवते यांचा दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर दरवाजा तोडून दंडवते यांचा दोन पंचांसमक्ष पंचनामा करून मृतदेह खाली घेण्यात आला. शवविच्छेदनासाठी सिल्वर जुबली याठिकाणी दंडवते यांंचा मृतदेह पाठवण्यात  आला आहे. अभियंता दंडवते हे या ठिकाणी कुटुंबा शिवाय राहत होते. त्यांचे कुटुंबीय सोलापूर या ठिकाणी राहण्यास होते. घटनेबाबत त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आलेली आहे. दंडवते यांनी आत्महत्या का केली, याबाबत कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.