खुनाच्या गुन्ह्यातील पोलिसांच्या चौकशीच्या दडपणाने मजुराची चिठ्ठी लिहून आत्महत्या
पुणे : पिंपरी सांडस येथे मासेमारी करत असणाऱ्या व्यक्तीची काही दिवस आधी हत्या झाली होती. या प्रकरणी पोलीस, संशयित एका मजूराची वारंवार चौकशी करत होते. मात्र, या खुनाच्या चौकशीत बरे वाईट होईल या भीतीपोटी भवरापूर येथील तरुणाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घटली आहे. लोणी काळभोर तसेच पुणे शहरच्या गुन्हे पथकाच्या पोलिसांनी या खून प्रकरणी त्याची सलग तीन दिवस चौकशी केली होती. आरोप सिद्ध न होताच पोलिसांच्या भीतीपोटी एका तरुणाचा जीव गेल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
बाबासाहेब बबन काटे (वय-३२, रा. भवरापूर, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. तर संतोष उर्फ पोपट तुकाराम गायकवाड (वय ४५ , रा. भवरापूर , ता.हवेली ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
गायकवाड यांचा मासेमारीचा व्यवसाय होता. ते मंगळवार (१ जानेवारी) रोजी बहिणीकडे जातो असे सांगून घराबाहेर पडले होते. त्यानंतर ४ जानेवारी रोजी त्यांचा मृतदेह शरीराचे धड व हात – पाय छाटलेल्या अवस्थेत मिळून आला होता. त्यानंतर रविवार (६ जानेवारी) रोजी त्याचे शिराचा व हाताचा भाग उरुळी कांचन येथील जुन्या तांबेवस्ती नजीकच्या ओढ्यात मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत बाबासाहेब काटे यांचेसह सुमारे २० जणांची लोणी काळभोर, लोणीकंद पोलीसांसह क्राईम ब्रँच युनिट ६ च्या पथकाने सलग तीन दिवस चौकशी केली होती. पोलिसांकडून सलग तीन दिवस झालेल्या चौकशी मुळे नैराश्यात गेलेल्या बाबासाहेब काटे याने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे.
चौकशी दरम्यान पोलिसांना मजूराकडे चिठ्ठी सापडली. पोलिसांकडून झालेल्या चौकशीमुळे खूनाचा आरोप आपल्यावर येईल अशी भीती वाटल्याने आत्महत्या केल्याचे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवले होते. तसेच, पोलिस चौकशीसाठी जावे लागत असल्याने माझ्या कामाच्या ठिकाणी खाडे होत आहेत. माझ्याकडे पैसे नाहीत व मी मेल्यानंतर माझ्या मुलीचे व बायकोचे कसे होणार? माझ्या मृत्यूनंतर घरच्यांना कोणीही त्रास देऊ नका. मला जेवढी माहिती होती तेवढी मी पोलिसांना दिली आहे. असे लिहिले होते.
तसेच, मला मरायचे नव्हते पण माझे नाव आले त्यामुळे मागील तीन दिवसांपासून मी जेवलो नाही किंवा मला झोपही लागली नाही. मला माझ्या मुलीला शिकवायचे होते. परंतु मला खूप टेंन्शन आल्यामुळे मी औषध घेत आहे. पोलिसांना जबाबदार ठरवत नसल्याचेही या चिट्ठीत त्याने नमूद केले आहे.
काही दिवसांपूर्वी संतोष उर्फ पोपट तुकाराम गायकवाड हे बहिणीकडे जातो असे सांगून घराच्या बाहेर पडले. त्यानंतर चार दिवसांनी त्यांचा मृतदेह शरीराचे धड व हात – पाय छाटलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर आणखी दोन दिवसांनी उरलेला मृतदेह आढळून आला. या हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली होती. त्यानंतर याप्रकरणी बाबासाहेब काटे यांचेसह सुमारे 20 जणांची लोणी काळभोर, लोणीकंद पोलीसांसह क्राईम ब्रँच युनिट 6 च्या पथकाने सलग तीन दिवस चौकशी केली होती.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!