महानगरपालिका क्षेत्रात पंधरा वर्षावरील मुलांचे लसीकरण वाढवा-उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा देण्याची गती वाढविण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर मुरलीधर मोहोळ, उषा ढोरे, जि. प.अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख उपस्थित होते.
पवार म्हणाले, १५ ते १८ वर्षावरील मुलांच्या लसीकरणासाठी कोवॅक्सिन लशीचा अधिक प्रमाणात पुरवठा होण्याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्यात येतील. तसेच सभागृह आणि खुल्या मैदानातील कार्यक्रमांना २०० पेक्षा अधिक व्यक्तिंच्या उपस्थितीसाठी परवानगी देण्याबाबत राज्यस्तरावर चर्चा करण्यात येईल. शिवजयंतीच्या दिवशी कार्यक्रमांना परवानगीबाबतही शासनस्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात कोविड संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी नागरिकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक असल्याचे श्री.पवार म्हणाले.
बैठकीत राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर १५.१० टक्के होता. मागील आठवड्यात १९ हजार २७३ नवीन रुग्ण आढळले आणि ४६ हजार ३३८ रुग्ण कोविडमुक्त झाले. जिल्ह्यात एकूण १ कोटी ६९ लाख ५२ हजार लसीकरण झाले आहे. ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या ४७ टक्के नागरिकांनी लशीची वर्धक मात्रा घेतली आहे, तर १५ ते १८ वयोगटातील ६९ टक्के मुलांनी लशीची मात्रा घेतली आहे. लशीच्या पहिल्या मात्रेचे ११० टक्के आणि दुसऱ्या मात्रेचे ८७ टक्के लसीकरण झाले.
बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, अशोक पवार, अतुल बेनके, दिलीप मोहिते, चेतन तुपे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, राजेश पाटील, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, कृष्ण प्रकाश, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.
बैठकीपूर्वी कौस्तुभ बुटाला यांनी सामाजिक दायित्व अंतर्गत नाविन्यपूर्ण आरोग्य सुविधांची माहिती दिली. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आमदार अरुण लाड यांच्या विकास निधीतून प्राप्त रुग्णवाहिका आणि आयसीआयसीआय फाऊंडेशनच्या ५ फिरत्या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले, तसेच हिराभाई बुटाला विचारमंच मार्फत ससून सर्वोपचार रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि मोबाईल ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले.
—–
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!