वाघाच्या ‘एंट्री’ने पुण्यात वाढणार शिवसेनेचे ‘वैभव ; युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वैभव वाघ यांचा शिवसेनेत प्रवेश
पुणे : गेली दोन दशके सामाजिक कार्यात भरीव योगदान देणाऱ्या वैभव वाघ यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाघ यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. वाघ यांच्या प्रवेशामुळे पुण्यात शिवसेनेच्या वैभवात भर पडणार आहे. वैभव वाघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ढोलताशा पथके आणि वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून गेली २० वर्षे सामाजिक कार्यात योगदान देत आहेत. निवडणूक रणनीतीकार म्हणून त्यांना दांडगा अनुभव आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा अशा तब्बल १११ पेक्षा अधिक निवडणुकांचे रणनीतीकार म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.
गणेशोत्सव मंडळ, ढोलताशा पथक आणि वंदे मातरम संघटनेतील कामामुळे युवावर्गात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क पक्षाला येत्या काळात फायद्याचा ठरणार आहे. कोरोना काळात वैभव वाघ यांनी गरजूंसाठी केलेले कार्य, अंत्यसंस्काराच्या कामात दिलेले योगदान, प्लाझ्मा प्रीमियर लीग उपक्रम अशा वैविध्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामासाठी वैभव वाघ यांना देशभरातून ‘हेल्थगिरी अवॉर्ड चे तिसरे नामांकन मिळाले होते. प्रदेशाध्यक्ष म्हणून वाघ यांनी वंदे मातरम संघटनेला राज्यभर विस्तारले आहे. त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि रणनीतीच्या कामाच्या अनुभवाचा शिवसेनेला आगामी निवडणुकांत फायदा होणार आहे.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वैभव वाघ म्हणाले, “गेली २० वर्षे सामाजिक संस्था, संघटना, गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून काम करत आहे. आजवर करत असलेल्या समाजकारणाला व्यापक रूप देण्यासाठी योग्य राजकीय पक्षाची निवड करणे गरजेचे होते. उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे यांच्यासह उपनेते रवींद्र मिर्लेकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहिर व अन्य काही नेत्यांशी गेल्या काही दिवसांपासून संपर्क सुरु होता. शहराच्या, राज्याच्या हितासाठी काम करण्याचे व्हिजन या नेत्यांकडे आहे. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी काळात सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या बरोबरीने शिवसेनेला मजबूत करण्याचा प्रयत्न राहील.”
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!