कर्ज फेडण्यासाठी माहेरहून २ लाख घेऊन न आणल्याने विवाहितेला फरशी साफ करण्याचे लिक्वीड पाजून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न ; कोंढव्यातील खळबळजनक घटना
पुणे : खरेदी केलेल्या फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये घेऊन येत नाही, या कारणावरुन विवाहितेला जबरदस्तीने फरशी साफ करण्याचे लिक्वीड पाजून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हांडेवाडी रोडवरील किंगस्टन सिरीन या सोसायटीत १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडला होता.
पती रेहान काझी, सासू नजमा काझी, नंणद गजाला काझी व हिना शेख असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.याप्रकरणी हडपसरमधील सय्यदनगर येथे राहणार्या एका २३ वर्षाच्या विवाहितेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पती, सासू, नंणदसह हांडेवाडी येथे रहात होत्या. रेहान काझी याने फ्लॅट खरेदी केला आहे.या फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी तो व त्याचे घरचे फिर्यादी यांनी माहेरहून २ लाख रुपये आणावेत, अशी मागणी करुन तिचा छळ करीत होते.
तिने माहेरहून पैसे न आणल्याने त्यांनी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सर्वांनी मिळून सवेरा कंपनीचे फरशी साफ करण्याचे लिक्वीड फिर्यादी यांना जबरदस्तीने पाजून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर तिने उपचार घेतल्यानंतर आता कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!