राज्यपालांनी केलेले ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य मागे घेऊन महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी; रुपाली चाकणकर
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोण विचारले असते? असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून कोश्यारी यांच्यावर शिवप्रेमी, राजकीय नेते यांच्याकडून टीका होऊ लागली आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला अयोग्य अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीसुद्धा ”रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले आपले वक्तव्य मागे घ्या आणि महाराष्ट्राची जाहीर माफी मागा” असे ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.
”छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु फक्त आणि फक्त राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि राजपिता शहाजीराजे भोसले आहेत हे लक्षात घ्यावे. त्यामुळे रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले आपले वक्तव्य मागे घ्या आणि महाराष्ट्राची जाहीर माफी मागा असं त्या म्हणाल्या आहेत. तर राज्यपाल कोश्यारी आपण महाराष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणून सगळीकडे मान, सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवत असताना हा महाराष्ट्र ज्यांच्या नावामुळे संपूर्ण जगभरात ओळखला जातो. त्यांच्याबद्दल बोलताना किमान अभ्यास करून बोलायला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.”
राजमाता जिजाऊ – शिवबांना “छत्रपती शिवाजी महाराज” म्हणून घडविणारी एक धैर्यवान माता आहेत. आणि राजपिता शहाजी राजे हे शिवबांच्या मनात “स्वराज्य” ही संकल्पना रुजविणारे कर्तुत्ववान पिता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
नाना पटोले यांचीही टीका
”रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते. काही विशिष्ट इतिहासकारांकडून इतिहासाची मोडतोड करुन रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न मागील काही वर्षात जाणीवपूर्वक केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कतृत्व व त्यांची किर्ती महान आहे. त्यांच्या पराक्रमाची महती सातासमुद्रापार आहे परंतु रामदास स्वामींना महाराजांचा गुरु दाखवून बुद्धीभेद केला जात आहे. भगतसिंह कोश्यारी हे घटनात्मक पदावर बसून इतिहासाची मोडतोड करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत आहेत. अशा व्यक्तीला राज्यपालपदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही, केंद्र सरकारने त्यांना परत बोलवावे अशी मागणी त्यांनी केली आहे.”
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!