हडपसरमध्ये हातउसने घेतलेल्या पैशासाठी तरुणाचे भरदिवसा अपहरण, अपहरणकर्त्या टोळीतील 5 जण अटकेत

पुणे : हातउसने घेतलेल्या पैशांसाठी भरदिवसा तरूणाचे मोटीरीतून अपहरण करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनीट पाचने जेरबंद केले. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे अवघ्या चार तासांमध्ये आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपींमध्ये पॅरोलवर सुटलेल्या आरोपीसह अरण गावच्या महिला सरपंचाच्या पतीचा सहभाग आहे. त्यांच्याकडून मोटार, चाकू असा 8 लाखांवर ऐवज जप्त करण्यात आला.

दीपक मोहन ताकतोडे (वय ३२, रा. मु.पो. अरण, भिमनगर, ता. माढा, जि. सोलापूर), छगन विठ्ठल जगदाळे (वय ३३, रा. मु.पो. अरण, संत सावतामाळी मंदिराजवळ, ता. माढा, जि. सोलापूर), भगवान दत्तु शिंदे (वय ४८, रा. मु.पो. अरण, शिंदेमळा, ता. माढा, जि. सोलापूर), विशाल नानासाहेब सावंत (वय २५, रा. अरण, पाटीलवस्ती, ता. माढा, जि. सोलापुर), विजय सिध्देश्वर शितोळे (वय २७, रा. मु.पो. अरण, खंडोबा मंदिराजवळ, ता. माढा, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

यातील भगावान शिंदे याच्यावर २०१० मध्ये खूनाच्या प्रकरणात शिक्षा झाली होती. कोरोना संसर्गामुळे त्याची पॅरोलवर  सुटका करण्यात आली होती. पॅरोलवर सुटला असताना त्याने हा गुन्हा केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतिक तांबोळी (वय ३०) हा पूर्वी सोलापूर येथे रहात होता. त्यावेळी त्याने छगन जगदाळे याच्याकडून उसने पैसे घेतले होते. ते त्याने परत केले नव्हते. त्याला पुण्यात एका बँकेत कंत्राटी स्वरुपात काम मिळाले होते. त्यासाठी तो पुण्यात येऊन राहू लागला होता. रविवारी सकाळी तो व त्याचा साडु यासीन शेख हे लग्नाला चालले होते. त्यावेळी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते शेवाळवाडी येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले. तेव्हा यासीन हा बाजूला उतरुन थांबला होता. त्यावेळी कारमधून काही जण आले व त्यांनी आतिक तांबोळी याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून पळवून घेऊन गेले.

यासीन याने पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती कळविली. त्याबरोबर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी तांबोळी यांच्या मोबाईलचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते नाना पेठेत आढळून आले. पोलिसांनी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. यासीन शेख याने तांबोळीचे ज्या गाडीतून अपहरण केले होते, त्याचा नंबर घेतला होता. पोलिसांना ही गाडी एका ठिकाणी सापडली. पोलिसांनी गाडीतील पाच जणांना ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्यांना हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हडपसर पोलिसांनी अपहरण केल्याचा  गुन्हा दाखल करुन पाच जणांना अटक केली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे , पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोंम्पे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, हवालदार प्रमोद टिळेकर, महेश वाघमारे, दया शेगर, रमेश साबळे, पोलीस नाईक पृथ्वीराज पांडुळे यांच्या पथकाने केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.