पार्क केलेल्या दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक, पावणे तीन लाखांची वाहने जप्त
पुणे : घराच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 2 लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये एक चारचाकी, रिक्षा आणि दुचाकींचा समावेश आहे.
विनोद सदाशिव पवार (वय – 31 रा. घुले वस्ती, मांजरी रोड, मांजरी ता. हवेली), निवृत्ती दत्तात्रय बर्डे (वय – 31 रा. गोपाळपट्टी, मांजरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सागर दत्तात्रय लोंढे (रा. राईकर हॉस्पिटलमागे, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची पॅशन प्लस दुचाकी (एमएच 12 एफ. जी 2145) घराच्या पार्किंगमध्ये लावली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरुन नेली. या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार संभाजी देविकर व शैलेश कुदळे यांना हा गुन्हा विनोद पवार याने त्याच्या इतर साथिदारांच्या मदतीने केल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी विनोद आणि निवृत्ती या दोघांना अटक करुन चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी त्यांचा तिसरा साथिदार सागर पवार याच्या मदतीने वाहन चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी विनोद पवार याच्याकडून गुन्ह्यात चोरलेली दुचाकी, मारुती 800, पॅशन प्लस, रिक्षा असा एकूण 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडून लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई , वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, पोलीस नाईक संभाजी देविकर, पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव विर, शैलेश कुदळे, निखील पवार, अजिंक्य जोजारे यांच्या पथकाने केली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!