पिंपरी चिंचवडमध्ये हुक्का पार्लरवर सामजिक सुरक्षा पथकाची कारवाई; बेकायदा हुक्का पार्लरचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
पिंपरी चिंचवड : पिंपळे गुरव येथील हॉटेलमध्ये चालणारा बेकायदा हुक्का पार्लर अड्डा पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने उद्ध्वस्त केला. या कारवाईत हॉटेलमालक, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पोलिसांनी 41 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी (दि. 14) सायंकाळी करण्यात आली.
हॉटेल चालक प्रसन्न शिवानंद पडेसूर (वय 27, रा. पिंपळे गुरव), हॉटेल व्यवस्थापक व्यंकटरमन्निया सुबय्या बोम्मनबोईना (वय 34, रा. पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक भगवंत मुठे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या हॉटेलमध्ये स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली नाही. हर्बल हुक्काच्या नावाखाली तंबाखूजन्य हुक्का पिण्यास दिला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये हुक्का, हुक्का पिण्यासाठी लागणारे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 41 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हुक्का पिण्यासाठी लागणारा जळीत कोळसा वापरून आगीसारख्या ज्वालाग्राही पदार्थांबाबत पुरेशी सुरक्षा व्यवस्था आरोपींनी बाळगली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!