मुलीसोबतचे मैत्रीसंबंध तोडण्यास सांगत तरुणाचा खून ; पुण्यातील वारजे परिसरातील घटना
पुणे : मुलीशी असलेले मैत्रीचे संबंध तोडून टाक, तिला त्रास देऊ नको असे सांगूनही न ऐकणाऱ्या तरुणाचा तिच्या नातेवाइकाने खून केला. वारजे परिरसरात ही घटना घडली. याप्रकरणी एका महिलेसह चौघांना वारजे पोलिसांनी अटक केली.
प्रद्युम्न प्रकाश कांबळे (वय २२, रा. रामोशीवाडी, सेनापती बापट रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अजय विजय पायगुडे (वय १९), विजय किसन पायगुडे (वय ५०), एक महिला (सर्व रा. साईश्रद्धा रेसिडन्सी, शिवणे), सागर गोविंद राठोड (वय २१, रा. डहाणूकर कॉलनी, कोथरूड) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एका अल्पवयीन मुलाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दांगट पाटील इंडस्ट्रीयल इस्टेट येथे असलेल्या साई श्रद्धा रेसिडन्सीमधील वंदना विजय पायगुडे या बुधवारी दुपारी घरी आपल्या मुलीला भेटायला आल्या होत्या. प्रद्युम्नला मुलीच्या आईने घरात का आला यावरून जाब विचारला असता झालेल्या वादावादीमध्ये वंदना पायगुडे यांनी प्रद्युम्न याला घरात कोंडून दांडक्याने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर तेथून निसटून पळाला असता त्याचा पाठलाग करून दांगट पाटील नगर येथील रस्त्यावर त्याला दोन युवकांच्या साहाय्याने मारहाण करण्यात आली.
याबाबत वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता युवकाला मारहाण करून रिक्षामधून दोन जण पळून गेले असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगीतले. प्रद्युम्न कांबळे याला वारजे माळवाडी येथील माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज (१८ मार्च, शुक्रवारी) सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संबंधित महिला, तिचा मुलगा आणि त्याच्या मित्राला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक आर. एन. पार्वे तपास करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!